

सुट्टीच्या वारी मृत्यूच्या दारी
राष्ट्रीय महामार्गावर वेगाने दुचाकी चालवण्याचे प्रकार
कासा, ता. २७ (बातमीदार)ः मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर १४० ते १६० किलोमीटर वेगाने धावणाऱ्या दुचाकींमुळे अपघातांचा धोका वाढला आहे. दर रविवारी पहाटे हा जीवघेणा थरार पाहायला मिळत असल्याने ‘सुट्टीच्या वारी मृत्यूच्या दारी’ असे म्हणण्याची वेळ स्थानिकांवर आली आहे.
मुंबई, ठाणे, घोडबंदर परिसरातून पहाटे ५० ते ६० जण महागड्या स्पोर्ट्स बाइक्सवरून पालघरच्या दिशेने रवाना होतात. अतिवेगाने महामार्गावरून झेपावणाऱ्या दुचाकींमुळे इतर वाहनचालक भयभीत होत आहेत. काही चालक महामार्गावर झिग-झॅग पद्धतीने गाड्या चालवणे, अचानक लेन बदलणे तसेच धोकादायक स्टंट्समुळे ही परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, ‘हॉटेल अहोरा’ परिसरात पोहोचण्यापूर्वीच शर्यत लावली जाते. त्यामुळे कार, ट्रक, बस, इतर चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. महत्त्वाचे म्हणजे, यापूर्वी अतिवेगामुळे अनेक भीषण अपघात झाले आहेत. काही चालकांनी जीव गमावला असून, काहींना कायमस्वरूपी दुखापतींना सामोरे जावे लागले आहे. तरीही धोकादायक प्रकाराला आळा बसलेला नसल्याने कारवाईची मागणी होत आहे.
------------------------
वाहतूक पोलिसांचा कानाडोळा
शनिवार तसेच दर रविवारी सकाळी महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन होत असताना वाहतूक पोलिस कारवाई करत नसल्याने स्थानिक ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. सीसीटीव्ही यंत्रणा, स्पीड गन, नियमित नाकाबंदीतून अशा वाहनचालकांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आंबोली ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.