महामार्गतील बाधित गोळा गटाचा गुंता सुटणार

महामार्गतील बाधित गोळा गटाचा गुंता सुटणार
Published on

भूसंपादनातील अडचणींवर मात
महामार्गातील बाधित गोळा गटाचा गुंता सुटणार
पालघर, ता. २७ ः वाढवण महामार्गामध्ये बाधित होणाऱ्या डहाणू तालुक्यातील वाणगाव, वरोर गावांमध्ये जमिनीची प्रक्रिया गुंतागुंतीची आहे. त्यामुळे भूसंपादनाचा मोबदला मिळवण्यात अडचणी उद्भवत असल्याने शनिवार, रविवारी अधिकारी शेतकऱ्यांच्या जमिनीवर जाऊन भेटीगाठी घेत आहेत. त्यामुळे पात्र बाधित नागरिक किंवा शेतकऱ्यांना मोबदला मिळणे सोप्पे होणार आहे.
वाणगाव गावामध्ये गुंतागुंतीची १२ हेक्टर जमीन ही सरकारी जमीन (गोळा गट) आहे. अणुऊर्जा प्रकल्पाचे पुनर्वसित गाव असल्याने सरकारी जमिनींचे वाटप पुनर्वसनासाठी झाले होते. या गावांमध्ये मोबदला मिळण्यासाठी जमिनीची हद्द निश्चिती नव्हती. त्यामुळे संभ्रम वाढला आहे. येथील पाच सर्व्हे क्रमांकांमध्ये जवळपास ७५ पोट हिस्से आहेत. गोळा गट पद्धतीची जमीन असल्याने नेमकी जमीन कोणाची बाधित होत आहे, हे समजणे कठीण झाले आहे. असाच काहीसा प्रकार वरोर या गावामध्येही आहे. हद्द निश्चिती होत नसल्यामुळे प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला होता. तसेच नागरिक आणि शेतकऱ्यांमध्येही भूसंपादनाच्या मोबदल्याला घेऊन संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी अशा प्रकरणांना गती देण्यासाठी डहाणूचे सक्षम प्राधिकारी, भूमी अभिलेखचे जिल्हा अधीक्षक, कृषी अधीक्षक आदी अधिकाऱ्यांना विशेष मोहीम सोपवली आहे.
--------------------
वाणगाव ः डहाणूचे तहसीलदार आताचे सक्षम प्राधिकारी यांचा वाणगाव येथील पुनर्वसन प्रक्रियेत सहभाग होता. त्या वेळी सरकारी जमिनींचे वाटप केल्याचा नकाशा, वाटपाचे अभिलेख उपलब्ध होते. त्या आधारे वाणगावमधील जमिनी, त्याचे खातेदार समजणार असल्याने संपादित जमिनी नेमक्या कोणाच्या हे समजू शकणार असून, मोबदला वाटपच्या प्रक्रियेला आणखी गती येणार आहे.
--------------------
वरोर ः डहाणू तालुक्यातील वरोर गावामध्ये ७५० या सर्व्हे क्रमांकाची जागा सरकारी गोळा गट असून, त्यामध्ये अनेक पोट हिस्से झालेले आहेत. अनेकांना या गटामध्ये खासगी हिस्से वाटपही झालेले आहेत. गावात जमिनीवरील नेमकी कोणाची कुठली जागा समजत नसल्यामुळे खातेदारांकडे उपलब्ध कागदपत्रे भूमी अभिलेख कार्यालयात मागवण्यात आली आहेत. त्यानंतर जागा निश्चिती होणार आहे.
-----------------------
गोळा गट म्हणजे काय?
सरकारी जमीन वाटप करत असताना एखाद्या सर्व्हे क्रमांकामध्ये तुलनेने जास्त खातेदार असतात. मात्र, त्यांच्या जमीन तुकड्यांची निश्चिती नसल्याने गोळा म्हणजे एकत्रित पद्धतीची राहते. अनेक खातेदारांचा समावेश असलेल्या जमिनीला एकच सर्व्हे क्रमांक असतो. त्याला ‘गोळा गट’ असे म्हटले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com