मुलांच्या आरोग्याशी खेळ

मुलांच्या आरोग्याशी खेळ
Published on

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २७ : नियोजित शहर म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या नवी मुंबईत एकाच इमारतीमध्ये शाळा आणि नागरी आरोग्य केंद्र सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महापे येथे नागरी आरोग्य केंद्राची इमारत बंद अवस्थेत आहे. त्यामुळे नागरी आरोग्य केंद्र येथील महापालिकेच्या प्राथमिक शाळेच्या इमारतीमध्ये चालवले जात आहे. शाळेच्या इमारतीमध्ये रुग्णालय सुरू असल्याने लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

नवी मुंबई महापालिकेतर्फे सुसज्ज अशा शाळेच्या इमारती उभ्या केल्या आहेत. त्याच धर्तीवर शहरात सामान्य रुग्णालयाच्या इमारतीदेखील महापालिकेने उभारल्या आहेत. परंतु सिडकोकालीन जुन्या झालेल्या नागरी आरोग्य केंद्रांच्या जागेवर महापालिकेतर्फे सुरू असलेले नवीन इमारतींचे बांधकाम पूर्णत्वास आलेले नाही. परिणामी अनेक गोरगरीब रुग्णांची आरोग्य सुविधांअभावी हेळसांड होत आहे. महापालिकेचे महापे येथील नागरी आरोग्य केंद्र बंद अवस्थेत होते. दरम्यान, कोरोना काळात नागरिकांना सुविधा मिळावी, याकरिता प्रशासनाने शाळेच्या इमारतीमध्ये नागरी आरोग्य केंद्र सुरू केले.

आता कोरोनानंतर परिस्थिती सामान्य झाली तरी शाळेच्या इमारतीमध्ये सुरू असलेले नागरी आरोग्य केंद्र महापालिकेने दुसऱ्या इमारतीमध्ये स्थलांतरित केलेले नाही. त्यामुळे इमारतीच्या तळमजल्यावर नागरी आरोग्य केंद्र सुरू असते, तर वरच्या मजल्यावर प्राथमिक आणि माध्यमिक शाळा भरवली जाते. या नागरी आरोग्य केंद्रात इतर साथीच्या आजारांच्या रुग्णांसोबत क्षयासारखे रुग्णदेखील उपचारासाठी येतात. अशा वातावरणात विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात असल्याने पालकांकडून संताप व्यक्त होत आहे. महापालिकेने लवकर शाळा इमारतीमधून नागरी आरोग्य केंद्र दुसऱ्या इमारतीमध्ये स्थलांतर करण्याची मागणी पालकांनी केली आहे.

माताबाल रुग्णालय कधी सुरू होणार?
कोपरखैरणे येथे माताबाल रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. हे काम पूर्ण करून वर्ष उलटून गेले तरी अद्याप हे रुग्णालय सुरू झालेले नाही. इमारत पूर्ण होऊनही प्रशासन रुग्णालय का लोकार्पण करीत नाही, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

रुग्णांची ओढाताण
माताबाल रुग्णालय बंद असल्याने येथील गरीब रुग्णांना खासगी रुग्णालयांत जावे लागते. त्यात ज्या रुग्णांची आर्थिक स्थिती चांगली नाही अशा गरीब रुग्णांना वाशी आणि ऐरोली येथील पालिकेच्या रुग्णालयांमध्ये जावे लागते. त्यामुळे वाशी आणि ऐरोलीतील रुग्णालयांवर ताणदेखील येत आहे.

कोपरखैरणेतील रुग्णांसाठी महापेमध्ये उपचार
सर्वसाधारण सभेत भाजपच्या प्रभाग क्र. १० मधील नगरसेविका सायली शिंदे यांनी एकाच इमारतीमध्ये शाळा आणि नागरी आरोग्य केंद्र भरत असल्याचा मुद्दा मांडला. त्यांच्या प्रभागामधील कोपरखैरणे येथील सेक्टर १ ते ४ सेक्टरमधील रुग्णांना महापे नागरी आरोग्य केंद्रात उपचारांसाठी जावे लागते.

शाळा आणि आरोग्य केंद्र एकाच ठिकाणी चालवणे हा अत्यंत गंभीर विषय आहे. यामुळे लहान मुलांवर संसर्गाचा धोका निर्माण होऊ शकतो तसेच त्यांच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होते. शाळा ही मुलांसाठी सुरक्षित आणि स्वच्छ जागा असायला हवी. प्रशासनाने याकडे तत्काळ लक्ष देऊन पर्यायी व्यवस्था करावी आणि मुलांच्या आरोग्य व सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे.
- सायली शिंदे, नगरसेविका, भाजप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com