गर्भावस्थेदरम्यान संसर्ग टाळणे महत्वाचे

गर्भावस्थेदरम्यान संसर्ग टाळणे महत्वाचे
Published on

गर्भावस्थेदरम्यान संसर्ग टाळणे महत्त्वाचे
आयव्हीएफ अँड फर्टिलिटी सल्लागार डॉ. परीक्षित टांक यांचे प्रतिपादन

मुंबई, ता. २८ : ‘गर्भधारणा स्त्रीला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अशा दोन्ही प्रकारे बदलते. अनेकदा स्त्रियांना गर्भधारणेच्या दृश्य, संप्रेरकांवर आधारित बदलांची माहिती असू शकते. त्यात खाण्याची इच्छा, थकवा आणि त्वचेतील बदल यांचा समावेश आहे. या महत्त्वाच्या गोष्टी असून त्यावर अनेकदा चर्चा केली जाते, परंतु एका गोष्टीबाबत खूप कमी चर्चा होते. ती म्हणजे शरीरात होणारे रोगप्रतिकारक शक्तीचे कार्य हे होय. गर्भावस्थेदरम्यान संसर्ग टाळणे महत्त्वाचे आहे,’ असे प्रतिपादन आयव्हीएफ अँड फर्टिलिटी सल्लागार डॉ. परीक्षित टांक यांनी नुकतेच केले.

डॉ. परीक्षित टांक म्हणाले, ‘गर्भधारणा ही एक अद्वितीय जैविक स्थिती आहे. स्त्रीच्या शरीरात वाढणारे बाळ दोन्ही पालकांची जनुके धारण करते. तरीही आईचे शरीर बाळाला स्वीकारते आणि त्याचे संरक्षण करते. हे शक्य करण्यासाठी, प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजेनसारख्या संप्रेरकांमुळे गर्भवती महिलेच्या रोगप्रतिकारक शक्तीची कार्यपद्धत बदलते. काही दाहक प्रतिक्रिया कमी केल्या जातात जेणेकरून गर्भ बाहेरील घटक म्हणून ओळखला न जाता त्याचे जतन केले जाईल. त्यामुळे एक अद्वितीय, संतुलित रोगप्रतिकारक स्थिती निर्माण होते. हा सौम्य बदल गर्भधारणा सुरक्षित ठेवण्यास मदत करते. तथापि, यामुळे गर्भवती महिलांना फ्लू, मलेरिया असे संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता असते.’ पुढे त्यांनी सांगितले, गर्भधारणेदरम्यान संसर्ग गर्भवती महिला आणि विकसनशील गर्भ या दोघांसाठीही गंभीर धोका निर्माण करू शकतो. काही संसर्गांमुळे मुदतपूर्व जन्म, गर्भपात किंवा जन्मजात दोष अशा गुंतागुंती होऊ शकतात. विशेषतः संसर्ग गंभीर होतो किंवा गुंतागुंत निर्माण होते तेव्हा काही मातांच्या जिवालाही धोका निर्माण होऊ शकतो. डांग्या खोकल्यासारखे संसर्गदेखील आहेत, ज्यांना पेर्ट्युसिस असेही म्हणतात. ते आईमध्ये सौम्य प्रमाणात दिसू शकतात परंतु नवजात बालकावर त्याचे अधिक गंभीर परिणाम होऊ शकतात. पेर्ट्युसिस झालेल्या गर्भवती महिलेला दीर्घकाळ खोकल्यासारखी लक्षणे जाणवू शकतात आणि तिला गंभीर गुंतागुंत होईल असे नाही. तथापि, ती प्रसूतीच्या वेळी संसर्गजन्य असेल तर ती जन्मानंतर लगेचच तिच्या नवजात बाळाला संसर्ग संक्रमित करू शकते. नवजात शिशूंमध्ये पेर्ट्युसिस विशेषतः गंभीर असतो आणि त्याचे अनेकदा चुकीचे निदानदेखील केले जाते. ज्या बाळांचे लसीकरण ते सहा आठवड्यांचे होईपर्यंत करता येत नाही, त्यांच्यात हा आजार वेगाने वाढू शकतो आणि गंभीर गुंतागुंतीला कारणीभूत ठरू शकतो. त्यात त्यांचा जीवही जाऊ शकतो.


लसीकरण नवजात मुलासाठी संरक्षण
गर्भधारणेदरम्यान लसीकरण हा संरक्षणाचा सर्वात प्रभावी मार्ग असू शकतो. ते संसर्ग आणि त्यानंतरच्या गुंतागुंतीपासून आईचे संरक्षण करू शकते. तिच्या आजाराचा धोका कमी करून, गर्भधारणेदरम्यान किंवा प्रसूतीच्या वेळी बाळाला संसर्ग होण्याची शक्यतादेखील कमी होते. तसेच गर्भधारणेदरम्यान लसीकरण नवजात मुलासाठीही संरक्षण प्रदान करते, डॉ. परीक्षित टांक यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘गर्भधारणेदरम्यान लसीकरणातून विकसित झालेल्या अँटीबॉडीज नाळेद्वारे बाळाला हस्तांतरित केल्या जातात आणि नियमितपणे लसीकरण करण्यासाठी पुरेसे वय होईपर्यंत रोगापासून संरक्षण प्रदान करतात. संसर्ग प्रतिबंधाला प्राधान्य देऊन आणि डॉक्टरांशी मातेच्या लसीकरणाबाबत चर्चा करून गर्भवती माता आपल्या आणि बालकाच्या आरोग्याचे रक्षण करण्यात सक्रिय भूमिका घेऊ शकतात.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com