उल्हास नदीवर आता ‘ड्रोन’च्या घिरट्या!

उल्हास नदीवर आता ‘ड्रोन’च्या घिरट्या!
Published on

बदलापूर, ता. २७ (बातमीदार) : लाखो नागरिकांच्या पाणीपुरवठ्याची जीवनवाहिनी असलेली उल्हास नदी सध्या प्रदूषणाच्या गंभीर विळख्यात अडकली आहे. बदलापूर परिसरात परिस्थिती अधिक चिंताजनक बनली आहे. या पार्श्वभूमीवर कुळगाव-बदलापूर नगर परिषदेने आता अत्याधुनिक ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून प्रदूषणाच्या स्रोतांवर लक्ष केंद्रित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

शहरात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) नसल्यामुळे घरगुती सांडपाणी मोठ्या प्रमाणात नाल्यांमार्फत थेट नदीत मिसळते. यासोबतच एमआयडीसी परिसरातील काही कंपन्यांमधून बाहेर पडणारे रासायनिक सांडपाणीही योग्य प्रक्रिया न करता नाल्यांत सोडले जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. परिणामी नदीच्या पाण्याची गुणवत्ता खालावत असून, पर्यावरणासह नागरिकांच्या आरोग्यावरही धोका निर्माण झाला आहे.

पर्यावरणप्रेमींनी या उपक्रमाचे स्वागत केले असले, तरी केवळ सर्वेक्षण न करता दोषींवर कठोर कारवाई करणे, औद्योगिक सांडपाण्यावर नियंत्रण आणणे आणि तातडीने एसटीपी उभारणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. उल्हास नदीचे पुनरुज्जीवन हे आता प्रशासनाच्या प्रभावी अंमलबजावणी आणि राजकीय इच्छाशक्तीवरच अवलंबून असल्याचे स्पष्ट होत आहे.

नदीपात्राचे सर्वेक्षण होणार
नगर परिषदेच्या कृती आराखड्यानुसार आता दररोज ठरावीक वेळेत हाय-डेफिनिशन व थर्मल कॅमेऱ्यांनी सज्ज ड्रोनद्वारे नदीपात्र आणि परिसराचे सर्वेक्षण केले जाणार आहे. या माध्यमातून बेकायदा नाले, सांडपाणी सोडणारी ठिकाणे, तसेच रासायनिक प्रवाहाचे स्रोत अचूकपणे ओळखणे शक्य होणार आहे. सांडपाण्यातील घटकांचे विश्लेषण करून प्रदूषणाचे मूळ शोधण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. यासोबतच नदीपात्रातील अडथळे, जलपर्णी, घनकचरा आणि अतिक्रमण शोधून त्यावर तातडीने उपाययोजना करण्यास मदत होणार आहे.

मार्गात वाढते प्रदूषणाचे सावट!
लोणावळा परिसरातून उगम पावणारी उल्हास नदी कर्जत तालुक्यातून वाहत बदलापूर, अंबरनाथ मार्गे पुढे कल्याण खाडीला मिळते. राज्यातील प्रमुख आणि विस्तीर्ण नदीपैकी एक असलेल्या या नदीवर लाखो लोकांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. मात्र, प्रवासादरम्यान विविध ठिकाणी नदीत मिसळणारे सांडपाणी, औद्योगिक रसायने, शेतीमधील खत-कीटकनाशकांचे अंश, तसेच प्लॅस्टिक व घनकचरा यामुळे प्रदूषणाची पातळी सातत्याने वाढत आहे.

नैसर्गिक समतोलावर परिणाम
बदलापूरमध्ये एसटीपीचा अभाव आणि अनियंत्रित शहरीकरण यामुळे नदीचा नैसर्गिक समतोल बिघडला आहे. अनेक ठिकाणी जलपर्णीचे प्रमाण वाढून पाण्याचा प्रवाह मंदावतो, तर नदीपात्रातील बेकायदेशीर बांधकामे आणि कचऱ्याचे ढीग यामुळे पाणी अडून सांडपाणी परत नागरी भागात शिरण्याच्या घटनाही घडत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com