एसटीच्या नियोजनाचा बोजवारा

एसटीच्या नियोजनाचा बोजवारा
Published on

ठाणे शहर, ता. २७ (बातमीदार) : लग्नसोहळा आणि गावखेड्यांत जत्रांचा हंगाम सुरू झाला आहे. तसेच शाळा, महाविद्यालयांना सुट्ट्या पडल्याने एसटीवरील प्रवाशांचा ताण वाढला आहे. मात्र ही समस्या दूर करण्यासाठी एसटी प्रशासन अपयशी ठरत आहे. उन्हाळी हंगामात जादा गाड्या सोडूनही वाढीव गाड्या नादुरुस्त असणे, प्रवाशांना न कळवता अचानक बस रद्द करणे असे प्रकार सर्रासपणे घडू लागल्याने प्रवासी आणि चालक, वाहकांमध्ये वाद वाढू लागले आहेत. निर्धारित वेळेत गाड्या सोडणे एसटी प्रशासनाला कठीण झाल्याने ठाणे विभागातील बसचे नियोजन कोलमडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

गावखेड्यांमध्ये जत्रांचे हंगाम, सुट्ट्या आणि लग्नसराई असल्याने गावाला जाणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. ठाणे विभागाने दोन महिन्यांसाठी १५ अतिरिक्त गाड्यांचे नियोजन केले आहे; मात्र त्यातील बहुतांशी गाड्या जुन्या आणि नादुरुस्त असल्याने त्या लांब पल्ल्याच्या वाहतुकीसाठी त्रासदायक ठरत आहेत. प्रवाशांना आगाऊ सूचना न देता बस रद्द केल्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे बसच्या वाहक, चालकांना प्रवाशांच्या संतापाचा सामना करावा लागत आहे. ठाणे-चंदगडदरम्यान धावणारी स्लीपर गाडी शनिवारी (ता. २५) आणि रविवारी (ता. २६) अचानक रद्द करण्यात आली. सलग दोन दिवस गाडी दुरुस्तीच्या कारणासाठी रद्द केलेली असतानाही त्याची पूर्वकल्पना प्रवाशांना देण्यात आली नव्हती. त्यामुळे प्रवासी आणि वाहकांमध्ये वंदना स्थानकावर मोठा वाद झाल्याचा प्रकार घडला.

प्रत्येक आगारात त्रस्त प्रवाशांच्या तक्रारी वाढल्या असून, वाहक, चालक आणि नियंत्रकांसोबत धक्काबुक्कीच्या घटना घडू लागल्या आहेत. अशा घटना घडत असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याने एसटी कर्मचाऱ्यांमध्येदेखील संताप आणि भीतीचे वातावरण पसरले आहे.

ऐनवेळी साधी बस
स्लीपरचे तिकीट आरक्षित करूनही ऐनवेळी साधी बस देण्यात आली, याबाबत विचारणा केली असता, वरिष्ठांकडून नियोजन करण्यात आल्याचे सांगण्यात आले. आता लहान मुलाला घेऊन साध्या बसने कसे जायचे, असे संतप्त झालेल्या भाग्यश्री पराळे या प्रवाशाने विचारले.

अनेक गाड्या रद्द
ठाणे-पुणे आणि इतर मार्गांवर ई-शिवनेरी बस धावतात. या बस ठेकेदारी पद्धतीवर चालत असल्याने मोठ्या बिघाडाच्या कारणाने पाच शिवनेरी दुरुस्तीकरिता उभ्या असल्याने रोजच अनेक फेऱ्या रद्द कराव्या लागत आहेत.

नादुरुस्तीची सबब
बस विलंबाने धावत असून, अनेक बस नादुरुस्त आहेत. त्यामुळे फेऱ्या रद्द कराव्या लागत असल्याचे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आले.

एक महिन्यापूर्वी स्लीपरचे तिकीट आरक्षित केले होते. आता स्थानकात आल्यावर साध्या बसने प्रवास करा, असे सांगण्यात आले. तसेच तिच्यात पाच आसने कमी आहेत. यायचे असेल तर या नाही तर तुमचे तुम्ही ठरवा, असे प्रशासनाकडून सांगितले गेले.
- परिणीशा जाधव, प्रवासी

ठाणे आगार १ मधून उशिरा आलेल्या गाड्या
२५ एप्रिलला प्रवाशांचे हाल
कराड - सुमारे ६ तास उशिरा
सातारा - ८ तास उशिरा
धनगाव - ६ तासांच्या प्रतीक्षेनंतर रद्द

तीन शिवशाही बस रद्द

२६ एप्रिलची स्थिती
धाराशिव - २ तास उशिरा
कराड - २ तास उशिरा
उमरगा - २ तास उशिरा
बेळगाव - १ तास उशिरा
सातारा - ६ तास उशिरा

गाड्या रद्द
सातारा - ३
शिवनेरी - ३
कराड - १

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com