वाढदिवसावेळी एसी बिघडल्याने पाहुण्यांची  झाली घुसमट

वाढदिवसावेळी एसी बिघडल्याने पाहुण्यांची  झाली घुसमट
Published on

एसी बिघडल्याने पाहुण्यांची घुसमट
नुकसानभरपाई देण्याचे रेस्टॉरंटला आदेश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : लोअर परळस्थित एका रेस्टॉरंटमध्ये वाढदिवसाच्या कार्यक्रमामध्ये एसी बंद झाल्याने पाहुण्यांची घुसमट झाली. त्यामुळे कार्यक्रमात गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याचे निरीक्षण नोंदवून जिल्हा ग्राहक न्यायालयाने तक्रारदार महिलेस नुकसानभरपाई देण्याचे आदेश रेस्टॉरंटला दिले.
कार्यक्रमासाठी रेस्टॉरंट आरक्षित करताना वातानुकूलन ही एक अत्यावश्यक बाब असते, असे नमूद करून उपनगरीय अतिरिक्त जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोगाचे अध्यक्ष प्रदीप कडू आणि सदस्य गौरी कापसे यांनी तक्रारदार महिलेचा अर्ज स्वीकारला. तसेच तक्रारकर्तीला झालेल्या त्रासासाठी २२,५५७ रुपये ऑगस्ट २०२४ पासून सहा टक्के वार्षिक व्याजाने देण्याचे आदेश दिले. त्यासोबतच महिलेला मानसिक त्रासापोटी १० हजार रुपये आणि कायदेशीर खर्चापोटी पाच हजार रुपये देण्याचेही आयोगाने स्पष्ट केले. ही रक्कम आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून ४५ दिवसांत देण्याचेही शेवटी नमूद केले.  
----
प्रकरण काय होते?
घाटकोपरस्थित तक्रारदार महिलेने जुलै २०२४ मध्ये नातेवाइकाच्या वाढदिवसानिमित्त लोअर परळ येथील एका रेस्टॉरंटमधील बँक्वेट हॉल आरक्षित केला होता. भोजन आणि इतर सेवांसाठी ३.६३ लाख रुपये भरले होते. तथापि, कार्यक्रमादरम्यान वातानुकूलन यंत्रणा बंद पडल्याने पाहुण्यांना घुसमटल्यासारखे वाटल्याने प्रचंड गैरसोय झाल्याचा आरोप तक्रारकर्तीने केला होता. रेस्टॉरंट व्यवस्थापनाने पंखे लावून तात्पुरती व्यवस्था केली, मात्र ती अपुरी ठरली. अनेक पाहुणे जेवण न करताच परतले. आपल्याला मानहानीच्या नाहक त्रासाला सामोरे जावे लागल्याचा दावाही तक्रारकर्तीने केला होता. 
---
आयोगाचे निरीक्षण
एखादा ग्राहक कौटुंबिक कार्यक्रमासाठी बँक्वेट हॉल आरक्षित करतो, तेव्हा वातानुकूलन ही त्या संपूर्ण सेवा संकुलाचा अविभाज्य घटक असतो, हे आयोगाने अधोरेखित केले. वातानुकूलनाचे शुल्क स्वतंत्रपणे आकारले गेले नसले तरी एकूण रक्कम ही वातानुकूलनासह सर्व सेवांसाठीची एकत्रित रक्कम होती. तसेच रेस्टॉरंट व्यवस्थापनाला नोटीस पाठवूनही ते आयोगासमोर हजर न राहिल्याने या प्रकरणाची सुनावणी त्यांच्या अनुपस्थितीतच पूर्ण केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com