तलवाडा-विक्रमगड राज्य मार्गाची दुरवस्था;

तलवाडा-विक्रमगड राज्य मार्गाची दुरवस्था;
Published on

राज्य मार्गावर धुळीशी सामना
तलवाडा-विक्रमगड प्रवास जीवघेणा
कासा, ता. २८ (बातमीदार)ः डहाणू, विक्रमगड, वाडा, ठाणे, भिवंडी भागांना जोडणारा महत्त्वाचा तलवाडा-विक्रमगड राज्य मार्ग अनेक वर्षांपासून खराब अवस्थेत आहे. या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून, डांबरीकरण पूर्णपणे उखडल्याने वाहनचालकांना धुळीशी सामना करावा लागत आहे.
गुजरात, सिल्वासा आदी औद्योगिक भागांतून ठाणे, भिवंडी शहरांकडे मालवाहतूक केली जाते. त्यामुळे अवजड वाहनांची सतत वर्दळ असते. मात्र, रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने वाहतुकीवर परिणाम होत आहे. तलवाडा ते विक्रमगड २० किलोमीटरचा प्रवास असून, अनेक ठिकाणी रस्ता पूर्णपणे गायब झाला आहे. मोठमोठे खड्डे, उखडलेली खडी, खचलेले भागांमुळे ३० मिनिटांच्या प्रवासासाठी तब्बल दीड तास लागत असल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
--------------------------
आरोग्याच्या तक्रारींमुळे बेजार
वाहनांच्या सततच्या वर्दळीमुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात धुळीचे लोट उडतात. त्याचा परिसरातील गावकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. धुळीमुळे आरोग्याच्या समस्या वाढत असून, अपघाताचा धोकाही निर्माण झाला आहे. खराब रस्त्यामुळे वाहनांमध्ये वारंवार बिघाड होत असून, सततच्या धक्क्यांमुळे मान, पाठ, कमरेच्या तक्रारींमुळे नागरिक बेजार झाले आहे.
--------------------
तलवाडा ते विक्रमगड रस्त्यावरून प्रवास करणे अत्यंत कठीण झाले आहे. पावसाळ्यात तर अनेक ठिकाणी तलावासारखी स्थिती निर्माण होते. त्यामुळे रस्त्याची दुरुस्ती तातडीने करावी.
-आशीष चव्हाण, ग्रामस्थ, चारोटी

Marathi News Esakal
www.esakal.com