

पाणीटंचाईतून सुटका
वांद्री मध्यम प्रकल्प वसईसाठी आरक्षित
विरार, ता. २८ (बातमीदार) ः वसई-विरार शहराला सूर्या प्रकल्पाच्या तीन टप्प्यांतून तसेच उसगाव, पेलहार धरणांतून २०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होत आहे; मात्र भविष्यातील पाण्याची गरज पाहता पालिकेने देहर्जे प्रकल्पासोबत वांद्री मध्यम प्रकल्पातील पाणी वसई-विरारकरांसाठी आरक्षित ठेवण्याचा ठराव मंजूर केला आहे. त्यामुळे भविष्यातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करता येणार आहे.
वसई-विरारकरांची तहान भागवण्यासाठी पालिकेने वांद्री धरणाकडे मोर्चा वळवला आहे. या धरणातून दररोज १८.२५ एमएलडी पाणी आरक्षित करण्याचा महत्त्वपूर्ण ठराव महासभेत सर्वानुमते मंजूर झाला. महासभेच्या मंजुरीनंतर हा प्रस्ताव आता अंतिम निर्णयासाठी राज्य सरकारकडे पाठवण्यात येणार आहे. महापालिकेने केवळ बाह्य स्तोत्रावर अवलंबून राहण्याऐवजी स्वतःच्या मालकीच्या धरण प्रकल्पांना गती दिली आहे. यामध्ये ‘खोलसापाडा १’ आणि ‘खोलसापादा २’ या दोन महत्त्वाच्या प्रकल्पांचा समावेश आहे. ज्यामुळे स्थानिक पाणीपुरवठा यंत्रणा अधिक सक्षम होईल. वांद्री प्रकल्पाचा ठराव मंजूर झाल्यामुळे शहराला भविष्यात पिण्याच्या पाण्यासाठी दिलासा मिळणार आहे.
=========================================================
वांद्री धरण ः सध्या राज्य शासनाच्या पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत असून पूर्णपणे विकसित आहे. त्यामुळे तांत्रिक प्रक्रियेबरोबर शासनाची अंतिम मंजुरी मिळाल्यास पुढील दोन ते तीन वर्षांत शहराला प्रत्यक्ष पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे.
------------------------------
खोलसापाडा ः १/२
खोलसापाडा एक या धरणाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे, तर खोलसापाडा दोन धरणाचे ९० टक्के काम पूर्ण आहे. या दोन्ही प्रकल्पांतून शहराला अतिरिक्त ६८ एमएलडी पाणी मिळणार आहे.
-----------------
२५ वर्षांचे नियोजन
वसई-विरारचे वाढते नागरीकरण लक्षात घेता वांद्रीच्या मध्यम प्रकल्पातूनही पाणी आरक्षित व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच खोलसापाडा, देहर्णे, सुसरी अशा विविध प्रकल्पांच्या माध्यमातून शहराची एकूण पाणीसाठवण क्षमता आणि पुरवठा वाढवण्याचे पालिकेचे उद्दिष्ट आहे. महापालिकेने भविष्यातील २५ वर्षांच्या पाण्याचे नियोजन केलेले आहे.
---------------------------
पाणीपुरवठ्याचे दीर्घकालीन नियोजन करताना पालिकेने मोठ्या प्रकल्पांवरही लक्ष केंद्रित केले आहे. यामध्ये देहर्जे प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला असून भविष्यात १९० एमएलडी पाणी मिळणार आहे. यासोबतच सुसरी धरणातून २०० एमएलडी पाणी मिळवण्याचे नियोजन पालिकेने केले आहे.
- सुरेंद्र ठाकरे, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.