प्रदूषण कारी कारखान्यामुळे वाड्यातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात

प्रदूषण कारी कारखान्यामुळे वाड्यातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात
Published on

प्रदूषणामुळे आरोग्य धोक्यात
टायर पायरोलिसिस, दगड खाणी, क्रशर प्लांट्ससारख्या कारखान्यांतून धुरांचे लोट

वाडा, ता. २८ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यातील वाडा तालुका सध्या औद्योगिक प्रदूषणाच्या विळख्यात सापडला आहे. येथे असणाऱ्या दगड खाणी, क्रशर प्लांट्स, टायर पायरोलिसिस आणि लोखंड बनवणाऱ्या उद्योगांमुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य मात्र धोक्यात आले आहे.

काही महिन्यांपूर्वी टायर प्रक्रियेसंबंधित उद्योगांमधून होणाऱ्या विषारी वायू उत्सर्जनामुळे परिसरातील गावांमध्ये आरोग्याचा धोका निर्माण झाला होता. जिल्हा प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर काही युनिट्सवर कारवाई झाली असली तरी अनेक ठिकाणी नियमांचे उल्लंघन सुरूच असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. नुकत्याच घडलेल्या विनापरवाना फटाका कारखान्यातील भीषण अपघातात दोघांना आपले प्राण गमवावे लागले. त्यामुळे पुन्हा एकदा नियंत्रण यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहू लागले. दरम्यान, वाडा आणि विक्रमगड तालुक्यात दगड खाणी आणि क्रशर प्लांट्सची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे हवेतील प्रदूषण वाढत आहे. त्यात तालुक्यात सुमारे ७७ टायर पायरोलिसिस युनिट्समुळे हवा आणि पाणी प्रदूषणाबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. यात निर्माण होणारे कार्बन ब्लॅकचे थर भातशेती व झाडांवर साचत असून, त्याचा फटका शेतीउत्पादनावर होत आहे. इतकेच नव्हे तर घनकचऱ्याची खुलेआम विल्हेवाट आणि प्रक्रिया न केलेले सांडपाणी शेती व वस्ती भागात सोडले जात असल्याच्या तक्रारीही वाढत आहेत.

एप्रिलमध्ये झालेल्या बैठकीत निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षकतेखाली या ७७ युनिट्सच्या सुरक्षेचा आणि प्रदूषण नियंत्रण नियमांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांपैकी किमान २४ युनिट्सकडे आवश्यक औद्योगिक सुरक्षा व आरोग्य परवाने नसल्याचेही समोर आले आहे.
----------
विविध आजार बळावले
निसर्गसंपन्न सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या तालुक्यात सुमारे ४५ टक्के वनक्षेत्र असतानाही अनधिकृत खाणी, आरएमसी आणि एएसी ब्लॉक उद्योगांमुळे हिरवाईवर गदा येत आहे. धुळीचे ढग आणि सिमेंटचा पसारा यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला आहे. ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ’ आणि महसूल विभागाच्या नियमानुसार, क्रशर युनिट्ससाठी उंच भिंती, पाणी फवारणी आणि हरित पट्टा बंधनकारक आहे. मात्र, प्रत्यक्षात या नियमांचे पालन होत नसल्याचे दिसते. आरएमसी प्लांटमधील सांडपाणी थेट नाल्यात नदीपात्रात सोडले जात असून, जलस्रोत प्रदूषित होत आहेत. तसेच तालुक्यात दमा, श्वसनाचे विकार आणि त्वचारोगांचे प्रमाण वाढले असून, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
-----------------
वाडा तालुक्यात एक हजाराच्या आसपास कारखाने असून, अद्याप त्यात वाढ होत आहे. यातील टायर पायरोलिसिस व लोखंड बनविणाऱ्या कारखान्यांमधून प्रचंड प्रमाणात प्रदूषण होत आहे. सदरच्या कंपन्या शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून कारखाने चालवत आहेत. स्थानिक ग्रामस्थ संबंधित विभागाकडे तक्रारी करतात. मात्र, त्यांच्या तक्रारींची दखल प्रशासन घेत नाही. उलट प्रशासन अर्थपूर्ण व्यवहार करून कारखानदारांना मदत करत आहे. त्यामुळे वाड्यातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
- श्रीकांत भोईर, सामाजिक कार्यकर्ते
-----------------
काही कारखानदार गावाजवळच कारखाने टाकत आहेत. ग्रामपंचायतींचा त्याला विरोध आहे. आमच्या ग्रामपंचायतीमध्येही एका कारखान्याला ग्रामसभेने परवानगी नाकारली, पण प्रदूषण नियंत्रण मंडळाने त्यांना परवानगी देऊन टाकली. अशा कारखान्यांमुळे नागरिकांना ध्वनी व वायू प्रदूषणाचा भविष्यात सामना करावा लागणार आहे. हे असंच राहिले तर पुढे भूमिपुत्रांना गावे सोडावी लागतील.
- शैला राजेश जाबर, सरपंच, ग्रामपंचायत घोणसई मेट

Marathi News Esakal
www.esakal.com