

जिल्ह्याची जनगणना यंदा डिजिटल
१ मेपासून प्रक्रियेला सुरुवात; प्रशासन सज्ज
अलिबाग, ता. २८ (वार्ताहर)ः भारत सरकारच्या निर्देशानुसार आगामी जनगणना २०२७ साठी रायगड जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून, या वेळेस माहिती संकलन पारंपरिक कागदपत्रांऐवजी पहिल्यांदाच मोबाईल ॲपच्या माध्यमातून डिजिटल पद्धतीने केले जाणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रक्रियेचा पहिला टप्पा १ मेपासून सुरू होत असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा प्रधान जिल्हा जनगणना अधिकारी किशन जावळे यांनी दिली.
देशाच्या इतिहासातील ही १६वी तर स्वातंत्र्यानंतरची आठवी जनगणना असणार आहे. जनगणना प्रक्रिया दोन टप्प्यांत पार पडणार असून, पहिला टप्पा घराची यादी व घरगणना या स्वरूपात १ मे ते १४ जून २०२६या कालावधीत राबविण्यात येणार आहे. जनगणना मोहिमेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील १५ तहसीलदार, १६ मुख्याधिकारी तसेच पनवेल महापालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांना ४ ते ६ मार्चदरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे प्रशिक्षण देण्यात आले. रायगड जिल्ह्यासाठी ६९ क्षेत्रीय प्रशिक्षक नियुक्त करण्यात आले असून, हे प्रशिक्षक तालुका व नगरपालिका स्तरावरील पाच हजार ९८ प्रगणक आणि ८६३ पर्यवेक्षकांना प्रशिक्षण देणार आहेत. तसेच जिल्ह्याचे मास्टर ट्रेनर प्रकाश संकपाळ, उपविभागीय अधिकारी कर्जत, समन्वय अधिकारी हरीश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली एप्रिल महिन्यात प्रशिक्षण सत्रे पार पडली. जनगणनेदरम्यान विचारली जाणारी वय, लिंग, शिक्षण, व्यवसाय आदी माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येणार असून, ती केवळ सांख्यिकीय व विकास नियोजनासाठीच वापरली जाणार आहे.
दोन टप्प्यांत जणगणना
१) १ ते १५ मेदरम्यान नागरिकांना https://se-census-gov-in या अधिकृत संकेतस्थळावरून स्वगणनाद्वारे स्वतःची माहिती ऑनलाइन भरता येणार आहे.
२) प्रगणकांकडून प्रत्यक्ष भेटी देऊन मोबाईल ॲपच्या माध्यमातून माहिती संकलन केले जाणार आहे. दुसरा टप्पा प्रत्यक्ष जनगणना स्वरूपात फेब्रुवारी २०२७मध्ये होणार आहे.
सहकार्याचे आवाहन
जनगणना ही देशाच्या सर्वांगीण विकासाचा पाया आहे. रायगड जिल्ह्यातील नागरिकांनी या राष्ट्रीय कार्यात सक्रिय सहभाग नोंदवून अचूक माहिती देऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.