मॉन्सूनपूर्व नालेसफाईला वेग

मॉन्सूनपूर्व नालेसफाईला वेग
Published on

तुर्भे, ता. २८ (बातमीदार) : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील नाले, गटारे, पावसाळी पाणी निचरा व्यवस्था, होल्डिंग पाँड व्यवस्थापन, पंपिंग स्टेशनची कार्यक्षमता, तसेच आपत्ती व्यवस्थापनाच्या तयारीचा सर्वांगीण आढावा घेण्यासाठी सभागृह नेते सागर नाईक यांनी शुक्रवारी (ता. २४) सर्वसाधारण सभेत ठराव मांडला. या ठरावाला सभागृहाने एकमताने मंजुरी दिल्यामुळे पावसाळापूर्व तयारीला वेग येणार असून शहरातील सखल भागांतील पाणी साचण्याच्या समस्यांवर ठोस उपाययोजना होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

सभागृहात विविध प्रभागांतील स्थानिक समस्यांवर सदस्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. दिघा येथील मुकुंद कंपनी परिसरात दरवर्षी पाणी साचण्याची गंभीर समस्या निर्माण होत असल्याचे सांगत नगरसेवक जगदीश गवते यांनी त्या ठिकाणी मोठ्या नाल्याचे डीप क्लिनिंग करण्याची मागणी केली. ऐरोली परिसरातील होल्डिंग पाँडमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याचे निदर्शनास आणत सदस्य अशोक पाटील यांनी तातडीने गाळ काढून त्या ठिकाणाचे सुशोभीकरण करण्याची मागणी केली.

एमआयडीसी क्षेत्रातील नाल्यांवर स्लॅब टाकून गाळे उभारण्यात आल्याने नालेसफाई कशी होणार, असा सवाल सदस्य सुधाकर सोनवणे यांनी उपस्थित केला. नवी मुंबईसारख्या नियोजित शहरातही पाणी साचणे, ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. शहरातील सखल भागांची यादी तयार करून संभाव्य पाणी साचणाऱ्या ठिकाणांचा सविस्तर अहवाल सादर करण्याची मागणीही करण्यात आली.

सभागृह नेते सागर नाईक यांनी प्रशासनाला लोकप्रतिनिधींसोबत प्रत्यक्ष पाहणी करण्याचे निर्देश दिले. नालेसफाईनंतर गाळ तत्काळ उचलणे आवश्यक असून ‘नाला व्हिजन’ योजनेअंतर्गत होल्डिंग पाँडचा विषय पुढील एक-दोन महिन्यांत सभागृहात मांडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. महापौर सुजाता पाटील यांनी दिघा ते बेलापूरदरम्यान १५ मे रोजी स्थानिक नगरसेवकांसोबत प्रत्यक्ष पाहणी दौरा करून ऑन-ग्राउंड अहवाल घेण्याचे जाहीर केले. प्रशासनाने सर्व नालेसफाईची कामे गतीने पूर्ण करावीत, असे निर्देश त्यांनी दिले.

खारफुटीतील अडथळे दूर
- खारफुटीमुळे अडथळा निर्माण होणाऱ्या नालेसफाईच्या कामांना वनमंत्री गणेश नाईक यांच्या पुढाकारानंतर गती मिळाली आहे. खारफुटी स्थलांतरित करून नाल्यांची साफसफाई शक्य होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. आपत्ती व्यवस्थापनासाठी ४२ अधिकाऱ्यांसह विविध प्राधिकरणांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली आहे.
- एपीएमसी परिसरातील नालेसफाई प्रशासनाकडून न झाल्यास पालिका स्वतः ती करेल, असे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनी सांगितले. नालेसफाईनंतर गाळ तीन ते चार दिवसांत न उचलल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल. तसेच धोकादायक इमारती रिकाम्या करण्याची कारवाईही हाती घेतली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com