पत्रकारांचा ‘चायवाला’ बबनशेठ यांचा पत्रकारांकडून ‘अमृततुल्य’ सत्कार

पत्रकारांचा ‘चायवाला’ बबनशेठ यांचा पत्रकारांकडून ‘अमृततुल्य’ सत्कार
Published on

‘पत्रकारांचा चायवाला’ बबनशेठ यांचा पत्रकारांकडून ‘अमृततुल्य’ सत्कार
फूटपाथपासून मंचापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ ः सोमवारी (ता. २७) पत्रकार संघात एक आगळावेगळा सत्कार रंगला होता. निमित्त होते, गेल्या पाच दशकांपासूनचा ‘पत्रकारांचा चायवाला’ असलेल्या दादर रेल्वे स्थानकाजवळील चहाच्या टपरीचे मालक बबनशेठ केमकर यांचा पंच्याहत्तरीनिमित्त ‘अमृततुल्य’ सत्काराचे. त्यांचा सत्कार करताना बबनशेठ हे त्या काळातील आर्थिक स्थित्यंतराचेही एक साक्षीदार असल्याचे उद्गार कुमार केतकर यांनी काढले.

पत्रकारितेतील गेल्या ५० वर्षांतील बदलत्या प्रवाहाचा साक्षीदार असलेल्या बबनशेठसाठी ‘एक चाय बबनसोबत’ हा विशेष सोहळा मुंबई मराठी पत्रकार संघात उत्साहात झाला. या वेळी प्रभाकर वाईरकर यांनी तयार केलेले व्यंगचित्र बबनशेठ यांना भेट देण्यात आले. या वेळी पत्रकार, साहित्यिक, कलाकार आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्यासपीठावर माजी आमदार कपिल पाटील, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, उपाध्यक्ष राजेंद्र हुंजे उपस्थित होते.

ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी या वेळी बोलताना पत्रकारितेतील बदलांचा आढावा घेत जुन्या काळातील टाइपरायटर, कार्बन पेपर आणि चहाच्या टपरीभोवती रंगणाऱ्या चर्चांची आठवण जागवली. ‘त्या काळातील पत्रकारितेची संस्कृती वेगळी होती आणि केमकर यांचा सत्कार हा त्या संस्कृतीचा सन्मान आहे,’ असे ते म्हणाले. माजी आमदार कपिल पाटील यांनी ‘मुंबईचा फूटपाथ हा गरीब माणसाचा आहे,’ असे सांगत अशा टपऱ्यांचे अस्तित्व टिकवण्याची गरज अधोरेखित केली. ‘फूटपाथ रिकामा झाला तर या माणसांचे काय,’ असा सवाल त्यांनी उपस्थित करत बबनशेठ यांच्या कार्याचे कौतुक केले.
------------------
विशेष पुस्तक
पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी सांगितले, की ‘चहाच्या टपरीभोवती निर्माण झालेल्या नात्यांमुळे अनेक पिढ्या जोडल्या गेल्या आहेत. बबनशेठ हे केवळ चहावाले नसून पत्रकारांचे मित्र, मार्गदर्शक आणि आधारवड होते.’ याप्रसंगी ‘बबनशेठ’ या विशेष पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकात अंबरीश मिश्र, संजीव साबडे, मीना कर्णिक यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपल्या आठवणी शब्दबद्ध केल्या आहेत. या पुस्तकाचे मुखपृष्ठ प्रदीप म्हापसेकर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com