

ऊर्जेचा शाश्वत स्रोत महत्त्वाचा
क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचे प्रतिपादन
वाडा, ता. २८ (बातमीदार) ः शेतकऱ्यांची उत्पादकता वाढवणे, महिलांनी कृषी प्रक्रिया उपक्रमांचे नेतृत्व करणे तसेच विद्युतीकरण झालेल्या शाळांमध्ये मुलांना शिक्षणाची उत्तम संधी मिळणे, हे खऱ्या अर्थाने विकासाचे सर्वसमावेशक प्रारूप आहे. उपजीविका सक्षम करण्यासाठी, पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी आणि जीवनमान सुधारण्यासाठी ऊर्जेचा स्रोत विश्वसनीय तसेच शाश्वत असणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी गुहीर येथे केले.
वाडा तालुक्यातील गुहिर येथे सचिन तेंडुलकर आणि श्नाइडर इलेक्ट्रिक इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने स्थापन झालेल्या स्प्रेडिंग हॅपिनेस इंडिया फाउंडेशनने गुहीर गावाचा कायापालट करून क्लायमेट स्मार्ट व्हिलेजमध्ये त्याचे रूपांतर केले आहे. या वेळी गावकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी हे प्रतिपादन केले.
सचिन तेंडुलकर पुढे म्हणाले, की अनियमित वीजपुरवठा आणि पारंपरिक ऊर्जास्रोतांवरील अवलंबित्वामुळे अनेक ग्रामीण भागात आव्हानांचा सामना करावा लागत आहे. शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासाला पाठिंबा देण्यासाठी स्वच्छ व प्रगत ऊर्जा तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण करून या आव्हानांना सामोरे जाणे हे क्लायमेट स्मार्ट व्हिलेजचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
या वेळी श्नाइडर इलेक्ट्रिक इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक शर्मा यांनी सांगितले, की स्वच्छ ऊर्जा आणि शाश्वत उपजीविका याच पायावर चांगले सामाजिक जीवन उभे राहते. जेव्हा तंत्रज्ञान, स्वच्छ हेतू आणि भागीदारी एकत्र येते तेव्हा काय साध्य करणे शक्य होते याचे गुहीर हे एक उदाहरण आहे.
ग्रामस्थांचा खूप फायदा
या वेळी सचिन तेंडुलकर यांनी आपल्या कुटुंबासह गुहीर गावाला भेट दिली. या उपक्रमाचा लाभ घेणाऱ्या शेतकरी, महिला उद्योजिका तसेच मुलांशी संवाद साधला. आमच्या गावात सौरऊर्जेचा प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पामुळे शेतीसाठी पाणी आणि कृषी प्रक्रिया युनिटची सुविधा मिळत आहे. वीज नसतानादेखील बॅकअपमुळे वीज उपलब्ध राहते. त्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांचा खूप फायदा होत असल्याचे गुहीरच्या सरपंच सरिता गायकर यांनी सांगितले.
११३ कुटुंबांना फायदा
या उपक्रमाअंतर्गत ४० किलो वॉट क्षमतेचा सौरपॅनेलचा संच आहे. जो श्नाइडर इलेक्ट्रिकच्या १० टी सक्षम स्मार्ट पाॅवर मॅनेजमेंट सिस्टीमशी जोडलेला आहे. ही प्रणाली सिंचन पंप आणि कृषी प्रक्रिया युनिटना वीज पुरवते. यात भातमळणी यंत्रे, तांदूळ गिरणी यंत्रे आणि मसाला प्रक्रिया युनिटचा समावेश आहे. ११३ कुटुंबे सुमारे २५ पथदिवे आणि अंगणवाडी केंद्राला या सौरऊर्जेचा फायदा होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.