

मेहतांच्या आरोपानंतर सरनाईक आक्रमक
विहंग ग्रुपने पाठवली नोटीस; तत्काळ बदनामी थांबवा
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २८ ः भाईंदरपाडा येथील जमीन व्यवहारावरून गंभीर आरोप करीत थेट पोलिस ठाणे गाठणाऱ्या भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या विरोधात परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. सर्व आरोप फेटाळत विहंग ग्रुपने नरेंद्र मेहता यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये मेहता यांनी केलेले आरोप आणि बदनामी तत्काळ थांबवावी, असा इशारा देण्यात आला आहे.
भाईंदरपाडा येथील एका जमीन व्यवहारप्रकरणी भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी ठाण्यात येऊन परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला. सरनाईक यांच्या विहंग कंपनीचे गुंड येथील भूमिपूत्रांना धमकावून जबरदस्ती जमीन बळकावत असल्याचा आरोप करीत त्यांनी कासारवडवली पोलिस ठाण्यात कारवाईची मागणी केली. आता या सर्व प्रकरणाची गंभीर दखल मंत्री सरनाईक यांनीही घेतली आहे. त्यांनी विहंग ग्रुपच्या वकिलांमार्फत आमदार नरेंद्र मेहता यांना नोटीस पाठवली आहे.
पाठवलेल्या नोटीसमध्ये नमूद केल्याप्रमाणे, भाईंदरपाडा (ठाणे) येथील संबंधित जमीन ही सर्व आवश्यक कागदपत्रे, परवानग्या आणि मंजूर आराखड्यानुसार विकसित केली जात आहे. त्या जमिनीवर कंपनीचा कायदेशीर ताबा असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच, नरेंद्र मेहता यांनी जाणूनबुजून जमीन बळकावणे, जबरदस्तीने ताबा घेणे आणि मारहाण यांसारखे गंभीर गुन्हे कंपनीवर खोटेपणाने केले आहेत. त्यांना कायदेशीर अधिकार नसताना संबंधित जमिनीवर प्रवेश करून तेथील कामकाजात अडथळा निर्माण केल्याचा आरोप नोटीसमध्ये करण्यात आला आहे.
दरम्यान, विहंग ग्रुपने मेहता यांना तत्काळ सर्व बदनामीकारक विधाने मागे घेण्याचा आणि भविष्यात अशा प्रकारचे कृत्य न करण्याचा इशारा दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.