

टोकावडे, ता. ४ (बातमीदार) : तालुक्यातील आंबळे (बु.) येथील पाच शेतकऱ्यांनी निकृष्ट बियाण्यांविरोधात उभारलेला लढा अखेर यशस्वी ठरला. तब्बल आठ वर्षांच्या संघर्षानंतर त्यांना नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. दीर्घकाळ चाललेल्या या प्रकरणामुळे शेतकऱ्यांच्या संयमाची आणि जिद्दीची कसोटी लागली होती.
२०१९मध्ये रामचंद्र पवार, पद्माकर पवार, धनाजी पवार, गणेश हरणे, शिवाजी पवार या शेतकऱ्यांनी भाडेतत्त्वावर घेतलेल्या दीड एकर जमिनीत आर्थिक गुंतवणूक करून भेंडीची लागवड केली. चांगल्या उत्पादनाच्या आशेने त्यांनी नामांकित कंपनीच्या बियाण्यांवर विश्वास ठेवला; मात्र प्रत्यक्षात उगवलेले पीक विक्रीयोग्य न राहता रोगग्रस्त आणि निकृष्ट स्वरूपाचे निघाले. अपेक्षित उत्पन्न तर दूरच, खर्चही निघणे कठीण झाले होते. या अपयशामुळे शेतकरी कुटुंबांचा उदरनिर्वाह धोक्यात येऊन मानसिक तणावही वाढला. कंपनीकडून जबाबदारी स्वीकारली जात नसल्याने शेतकऱ्यांनी न्यायासाठी ग्राहक मंचाचा दरवाजा ठोठावला. त्यावेळी स्थानिक माध्यमांनीही या प्रकरणाची दखल घेत आवाज उठवला.
शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय
दीर्घ सुनावणी आणि पुराव्यांच्या आधारे अखेर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय दिला. या प्रकरणात काँग्रेसचे चेतनसिंग पवार यांचे सहकार्य लाभले, तर अॅड. संदीप भोईर यांनी कायदेशीर बाजू सक्षमपणे मांडत शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला.
आठ वर्षे मंचाकडे फेऱ्या
न्याय मिळाल्याचा आनंद असला तरी, शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी इतकी वर्षे न्यायालयीन लढा द्यावा लागणे ही चिंतेची बाब असल्याचे सांगण्यात येत आहे. ठाणे येथे वारंवार फेऱ्या मारत, वेळ आणि पैसा खर्च करत हा लढा जिंकावा लागणे ही वस्तुस्थिती व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरते. शेतकरी जरी अन्याय सहन करत नसला तरी न्याय मिळवण्यासाठी त्याला अजूनही प्रदीर्घ संघर्ष करावा लागतो हे या प्रकरणाने स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.