फॉर्म्युला ४ स्ट्रीट रेसच्या नावाखाली दिवसाढवळ्या शेकडो झाडांची कत्तल

फॉर्म्युला ४ स्ट्रीट रेसच्या नावाखाली दिवसाढवळ्या शेकडो झाडांची कत्तल
Published on

स्ट्रीट रेसच्या नावाखाली शेकडो झाडांची कत्तल
नवी मुंबईतील पर्यावरणप्रेमींमध्ये तीव्र असंतोष
बेलापूर, ता. ४ (बातमीदार) ः नवी मुंबईत साधारण डिसेंबर महिन्यात फॉर्म्युला ४ स्ट्रीट रेस पार पडणार आहे. यासाठी शहरात जय्यत तयारी सुरू असून, दुसरीकडे पर्यावरणप्रेमी संस्थांकडून या रेससाठी कापण्यात येणाऱ्या झाडांबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. सुरुवातीला नेरूळ परिसरातील सुमारे ७० ते ८० झाडे तोडण्याच्या किंवा स्थलांतरित करण्याच्या प्रस्ताव होता. मात्र, प्रत्यक्षात १०० हून अधिक झाडे कापण्यात येत असून, लहान-मोठ्या झाडांचे पुनर्वसन दुसऱ्या ठिकाणी अपेक्षित असताना प्रत्यक्षात ते पुनर्वसन अथवा पुनर्लागवडदेखील करण्यात येत नसल्याचा आरोप पर्यावरणप्रेमी संस्थांकडून करण्यात येत आहे.
अलीकडेच, आरपीपीएल आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात एक करार झाला. त्यानंतर महाराष्ट्राची पहिली फॉर्म्युला नाइट स्ट्रीट रेस नवी मुंबईत होणार असल्याचे ठरले. नवी मुंबई स्ट्रीट रेस ही महाराष्ट्राच्या मोटरस्पोर्ट प्रवासातील ऐतिहासिक टप्पा असणार आहे. ही रेस नवी मुंबईतील पाम बीच रोडवरून सुरू होऊन बुलेवार्डमार्गे नेरूळ तलावापर्यंत जाणार आहे. यासाठी ३.७ किलोमीटर लांबीचा विशेष सर्किट तयार केला जाणार असून, त्यात १४ आव्हानात्मक वळणे असतील. या ट्रॅकवरूनच चालकांच्या कौशल्याची खरी कसोटी लागणार आहे. मात्र, हे सर्व आयोजन करत असताना वृक्ष प्राधिकरण विभागाकडून मिळालेल्या झाडे कापण्याच्या परवानगीवरून मोठे वादंग उठले आहे. अनेक झाडे दिवसाढवळ्या कापली जात असून, या रेससाठी पर्यावरणाचा नाश का, असा सवाल पर्यावरणप्रेमींकडून उपस्थित केला जात आहे.

याबाबत आवश्यक परवानगी विविध विभागांकडून प्राप्त आहेत. मात्र, काही झाडांचे पुन्हा पुनर्वसन करण्याचे निर्देशदेखील आहेत. हे पुनर्वसन अथवा पुनर्लागवड होत आहे की नाही याबाबत आम्ही पाहणी करू.
- स्मिता काळे, उपायुक्त, उद्यान विभाग, नवी मुंबई महापालिका

नवी मुंबई महापालिका सिडकोच्या पावलांवर पाऊल ठेवत आहे. झाडे तोडून एखादा प्रकल्प करणे कोणत्या कायद्यात आहे. खारफुटी असेल अथवा झाडे असतील हे एक निमित्त आहे. यामागचा उद्देश चांगला नाही. भविष्यात शहरात वृक्ष संपत्ती राहणार नाही. केवळ इमारती दिसतील. ही नवी मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा आहे.
- सुनील अग्रवाल, संचालक, सेव्ह नवी मुंबई इन्व्हायर्न्मेंट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com