

प्लॅस्टिक पिशव्या वापरणाऱ्यांना पालिकेचा दणका
आर्थिक वर्षात ३५८ दुकानदारांवर दंड, १८ लाखांची वसुली
वाशी, ता. ४ (बातमीदार) ः नवी मुंबई महापालिकेने शहरात प्लॅस्टिक पिशव्यांच्या वापरावर आळा घालण्यासाठी मोहीम राबवत कठोर कारवाई सुरू ठेवली आहे. पर्यावरण संरक्षण आणि स्वच्छतेच्या दृष्टीने प्लॅस्टिक बंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने शहरातील विविध भागात सातत्याने तपासणी मोहीम हाती घेतली आहे. एप्रिल २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीत या मोहिमेदरम्यान एकूण ३५८ दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईतून पालिकेला सुमारे १८ लाख रुपये दंड स्वरूपात महसूल प्राप्त झाला आहे. याशिवाय एक हजार ६९३ किलो प्लॅस्टिक पिशव्या व इतर प्रतिबंधित प्लॅस्टिक साहित्य जप्त करण्यात आले आहे.
पालिकेच्या पथकांकडून बाजारपेठा, किराणा दुकाने, भाजी मार्केट, हॉटेल्स तसेच मॉल परिसरात अचानक छापे टाकून प्लॅस्टिकचा साठा तपासला जात आहे. विशेषतः ज्या भागांमध्ये पूर्वी उल्लंघन आढळले होते, त्या ठिकाणी अधिक काटेकोरपणे कारवाई केली जात आहे. नियमांचे वारंवार उल्लंघन करणाऱ्यांवर पालिकेने कठोर भूमिका घेतली आहे. पालिकेच्या या धडक कारवाईमुळे शहरातील अनेक दुकानदारांकडून प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर टाळला जात आहे. अनेक व्यापाऱ्यांनी कापडी व कागदी पिशव्यांचा वापर सुरू केला असून, ग्राहकांनाही पर्यावरणपूरक पर्याय स्वीकारण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
जप्त करण्यात आलेल्या प्लॅस्टिकचा पर्यावरणपूरक पद्धतीने पुनर्वापर केला जात आहे. हे प्ल२स्टिक डम्पिंग ग्राउंडवर नेऊन त्याचे बारीक कण करण्यात येतात. त्यानंतर हे कण डांबरामध्ये मिसळून रस्ते बांधकामात वापरले जातात. या प्रक्रियेमुळे प्लॅस्टिक कचऱ्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होत असून, रस्त्यांचा टिकाऊपणाही वाढतो.
चौकट
दंडात्मक कारवाई
पहिल्यांदा प्लॅस्टिक वापर करताना आढळल्यास पाच हजार रुपये दंड आकारला जातो. दुसऱ्यांदा पकडल्यास १० हजार रुपये आणि तिसऱ्यांदा नियमभंग केल्यास १५ हजार रुपये दंड आकारण्यात येतो. या कालावधीत दुसऱ्यांदा उल्लंघन करणाऱ्या आठ दुकानदारांवर तर तिसऱ्यांदा उल्लंघन करणाऱ्या दोन दुकानदारांवर कारवाई करण्यात आली आहे.
कोट
नवी मुंबई शहर प्लॅस्टिकमुक्त करण्यासाठी पालिकेकडून सातत्याने विशेष मोहिमा राबविल्या जात आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कोणतीही तडजोड न करता कारवाई केली जाईल. व्यापाऱ्यांनी तसेच नागरिकांनी कापडी व कागदी पिशव्यांचा वापर करून पर्यावरण संवर्धनात आपला सहभाग नोंदवावा.
अजय गडदे, उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.