

ठाणे शहर, ता. ४ (बातमीदार) : घोडबंदर परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी रस्त्याचे रुंदीकरण करून सहा पदरीकरण केले जात आहे. हे काम अंतिम टप्प्यात आले आहे, परंतु काही ठिकाणी रुंदीकरणाचे नियोजन चुकलेले दिसत आहे. राजकीय हस्तक्षेपामुळे सामान्यांच्या हरकती आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यांना बगल देत रस्ता रुंदीकरणाचे काम पुढे नेण्यात आले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणे भविष्यात वाहतूक कोंडी आणि अपघातांना निमंत्रण देणारी ठरू शकणार आहेत.
ठाण्यातील घोडबंदर मार्ग अवजड वाहतुकीचा महत्त्वाचा मार्ग आहे. उरण येथील जेएनपीएमधून रोज हजारोंच्या संख्येने मालवाहक वाहनांची वाहतूक होते. त्यामुळे हा मार्ग वाहतूक कोंडीचा म्हणूनदेखील ओळखला जातो. या कोंडीचा मार्गावरील वाहनचालक, परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रास होतो. तो कमी करण्याकरिता मार्गाचे सहा पदरीकरणामध्ये रूपांतर केले जात आहे. सोबतच मेट्रो मार्गिकादेखील टाकण्यात आली आहे. मात्र, मोठ्या प्रमाणात उपाययोजना असूनही कोंडी फोडण्यासाठी योग्य नियोजन झाले नसल्याचे दिसून येत आहे.
असा आहे सावळा गोंधळ...
- कापूरबावडी नाका येथे भिवंडी आणि ठाण्याच्या दिशेने मेट्रोचे खांब रस्ताच्या मध्यभागात उभे केले आहेत. त्यामुळे रस्ता अरुंद झाला असून, येथे कोंडी होणार आहे.
- कापूरबावडी येथे ठाणे वाहिनीवरील सहा पदरी रस्ता एकदम अरुंद होऊन दोन पदरी केला आहे. त्यातील दोन पदरी पुलावर आणि दोन पदरी माजिवडा नाक्याकडे जात असल्याने येथे कोंडी होण्याची दाट शक्यता आहे.
- तत्त्वज्ञान विद्यापीठ येथे मुंबईकडून येणारी मेट्रो आणि भिवंडीकडे जाणाऱ्या मेट्रोची दोन स्थानके एकत्र असून, भिवंडीकडे जाणाऱ्या मेट्रोसाठी पुलाच्या चढणीजवळ खांब उभा केला आहे. त्यावर वाहने आदळून अपघात होऊ शकतो. शिवाय स्थानकातून भिवंडीकडे जाण्यासाठी टाकलेली मेट्रो मार्गिका सेवा रस्त्याच्या बाजूने न घेता येथील व्यापाऱ्यांच्या फायद्यासाठी रस्त्याच्या मधून टाकण्यात आल्याची चर्चा आहे.
- तत्त्वज्ञान विद्यापीठ, मानपाडा, कासारवडवली, ओवळा मेट्रो स्थानकाच्या पायऱ्या रस्त्याच्या मधोमध उतरवल्याने प्रवाशांना जीवावर उदार होऊन रस्ता ओलांडावा लागणार आहे.
- मेट्रो स्थानक परिसरात रिक्षा, दुचाकी उभ्या करण्यासाठी जागा ठेवण्यात आली नसल्याने घरापर्यंत जाण्यासाठी प्रवाशांची पायपीट होणार आहे.
- मानपाडा येथे रस्त्याच्या बाजूला पदपथ शिल्लक राहिले नाहीत. त्यामुळे दुकानामधून बाहेर आल्यास थेट वाहनाखाली जाण्याची भीती आहे.
घोडबंदर रस्त्याचे रुंदीकरण झाले, ही चांगली बाब असली तरी सेवा रस्त्यांचे एकत्रीकरण करताना काही ठिकाणी मात्र पादचाऱ्यांना चालण्यासाठी पदपथ शिल्लक ठेवले नाहीत. अपघातात एखाद्याचा जीव गेला, तर जबाबदार कोण?
- विक्रम वाहुळे, पादचारी, मानपाडा
सेवा रस्ते काढून टाकल्याने शेजारच्या काही फूट अंतरावर असलेल्या सोसायटीत गाडी घेऊन जायचे असेल, तर दोन-तीन किमीचे अंतर कापून दोनदा रस्ता ओलांडून जाता येणार आहे, ही पद्धत चुकीची आहे. अनेक ठिकाणी अडथळे उभे केले आहेत.
- नरेश मणेरा, माजी महापौर, ठाणे महापालिका
घोडबंदर मार्ग परिसरा राहणे, वाहन चालवणे प्रचंड त्रासदायक झाले आहे. येथील वाहतूक कोंडी फोडणे महत्वाचे असताना काही ठिकाणी अडथळे उभे करून प्रशासनाने सावळा गोंधळ घालून ठेवला आहे.
- गिरीश पाटील, सदस्य, जस्टीस फॉर घोडबंदर ग्रुप
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.