माथेरानसाठी किमान ११२ ई-रिक्षांची गरज

माथेरानसाठी किमान ११२ ई-रिक्षांची गरज
Published on

माथेरानमध्ये ई-रिक्षांची प्रतीक्षा
११२ रिक्षांची गरज ः सनियंत्रण समितीने निर्णय घेण्याची मागणी
कर्जत, ता. ४ (बातमीदार) ः माथेरानमध्ये पर्यावरणपूरक वाहतुकीसाठी किमान ११२ ई-रिक्षांची आवश्यकता असल्याचा निष्कर्ष समोर आला आहे. सध्या अवघ्या २५ ई-रिक्षा सुरू असल्याने स्थानिक नागरिक, विद्यार्थी व पर्यटकांना तासनतास प्रतीक्षा करावी लागत असून, विद्यार्थ्यांना गर्दीतून प्रवास करावा लागत आहे.
माथेरानमध्ये ब्रिटिशकाळापासून हातरिक्षांचा वापर होत असला तरी ही पद्धत अमानवीय असल्याचा मुद्दा उपस्थित करत सामाजिक कार्यकर्ते सुनील शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर निर्णय देताना सरन्यायाधीश भूषण गवई यांनी ६ ऑगस्ट २०२५ रोजी हातरिक्षा प्रथा अमानवीय असल्याचे मान्य करत चालकांचे पुनर्वसन ई-रिक्षांद्वारे सहा महिन्यांत करण्याचे आदेश दिले. तसेच, गरजू व आदिवासी महिलांनाही या योजनेत सामावून घेण्याचे निर्देश देण्यात आले. ई-रिक्षांची संख्या निश्चित करण्याचा अधिकार राज्य शासनाच्या सनियंत्रण समितीकडे देण्यात आला असून, स्थानिक लोकसंख्या व पर्यटकांची गरज लक्षात घेऊन निर्णय घेण्याचे निर्देश आहेत. यासाठी श्रमिक रिक्षा संघटनेने चार्टर्ड अकाउंटंट संदेश कदम यांची मदत घेत आकडेवारीचे विश्लेषण केले.

अभ्यासाअंती ११२ ई-रिक्षांची गरज स्पष्ट
१ या अभ्यासानुसार, दररोज सुमारे ४०० स्थानिक प्रवासी, ९६ शासकीय व कचरा संकलन कर्मचारी, तसेच ३८५ विद्यार्थी व शिक्षक प्रवास करतात. याशिवाय, आठवड्याच्या दिवशी सरासरी ४,४४९ तर सुट्टीच्या काळात १०,७८४ पर्यटक माथेरानला भेट देतात. २०२३ मध्ये ८.९० लाख, २०२४ मध्ये ९.८४ लाख आणि २०२५ मध्ये १०.१८ लाख पर्यटकांची नोंद झाली असून दरवर्षी सुमारे १० टक्के वाढ होत आहे.
२ विद्युतपुरवठा खंडित होण्याच्या समस्येमुळे अतिरिक्त १० टक्के ई-रिक्षांची गरज लक्षात घेता, किमान ११२ ई-रिक्षा आवश्यक असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
३ नेरळ-माथेरान मार्गावर सुमारे ३०० टॅक्सी, ५०० खासगी वाहने व १५० दुचाकींमधून पर्यटक येतात. या सर्व बाबींचा विचार करून सनियंत्रण समितीने ई-रिक्षांची संख्या तातडीने निश्चित करावी, अशी मागणी याचिकाकर्ते सुनील शिंदे यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com