

भिवंडी, ता. ७ (वार्ताहर) : मतदार याद्या पुनर्सर्वेक्षण आणि जनगणना कामांमुळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण वाढल्याने ते त्रस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर शिक्षण क्रांती संघटनेच्या कल्याण-डोंबिवली महानगर शाखेने प्रशासनाकडे विविध मागण्या मांडत निवेदन दिले. त्यानंतर प्रशासनाधिकारी दालनात झालेल्या बैठकीत जनगणना आणि बीएलओ कामावर नियुक्त कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीला शिक्षण क्रांती संघटनेचे राज्याध्यक्ष सुधीर देवराम घागस, राज्य संघटक आर. डी. पाटील, महानगर जिल्हाध्यक्ष गजानन पाटील, जिल्हा कार्यवाह थॉमस शिनगारे उपस्थित होते. प्रशासनाच्या वतीने प्रशासनाधिकारी भारत बोरनारे, विलास नंदनवार, विलास लिखारे तसेच संबंधित कर्मचारी उपस्थित होते. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या ऐकून घेतल्यानंतर काही मागण्या तातडीने मान्य करण्यात आल्या असून, उर्वरित मागण्या पालिका आयुक्तांकडे सादर करून त्यावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे प्रशासनाधिकारी भारत बोरनारे यांनी स्पष्ट केले. संघटनेच्या मागण्यांनुसार मुख्याध्यापकांना जनगणना आणि बीएलओ कामातून वगळण्यात आले आहे. तसेच दुर्धर आजाराने ग्रस्त कर्मचारी आणि पुढील सहा महिन्यांत सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना या कामातून सवलत देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. बीएलओ अथवा जनगणना यापैकी एकच काम संबंधित कर्मचाऱ्यांना दिले जाईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले. दरम्यान, आवश्यक मनुष्यबळ कमी पडत असल्याने स्वयंअर्थसहाय्यित शाळांतील कर्मचाऱ्यांनीही या कामात सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले. सर्व विभागांतील कर्मचाऱ्यांची समप्रमाणात नियुक्ती केली जात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
विविध मागण्या
प्रशासनाकडून मानसिक त्रास दिला जात असल्यास किंवा गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या दिल्यास संबंधित अधिकाऱ्यांविरोधातच कारवाईची मागणी करून या कामांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. याशिवाय, जनगणना व बीएलओ काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचा एक कोटी रुपयांचा विमा उतरवण्यात यावा, अशी मागणी जिल्हाधिकारी आणि सरकारकडे करण्यात आली आहे. या कामासाठी देण्यात येणारे मानधन संबंधित कर्मचाऱ्यांच्या खात्यात थेट जमा करण्यात यावे, अशीही मागणी संघटनेने केली आहे.