

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ६ : आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम स्थानिक पातळीवर कसा जाणवू शकतो, याचे उदाहरण सध्या कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या स्मशानभूमींमध्ये पाहायला मिळत आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर व्यापारी गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यात झालेल्या अडचणींमुळे शहरातील गॅस शवदाहिन्या दीड महिन्यापासून बंद आहेत. नागरिकांना पर्याय नसल्याने लाकडावरच अंत्यसंस्कार करावे लागत आहे. यामुळे आर्थिक आणि पर्यावरणीय दोन्ही समस्या निर्माण झाल्या आहेत.
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत सहा ते सात स्मशानभूमींमध्ये गॅस शवदाहिन्या उभारण्यात आल्या आहेत. सामान्यतः नागरिकांच्या मागणीनुसार पार्थिवाचे दहन गॅस किंवा लाकडावर केले जाते. मात्र, सध्या व्यापारी गॅस सिलिंडरचा पुरवठा अपुरा असल्याने या गॅसदाहिन्या पूर्णपणे बंद आहेत. परिणामी, अनेक नागरिक गॅसदाहिनीत अंत्यसंस्कार करण्याची मागणी करत असतानाही कर्मचाऱ्यांना नकार द्यावा लागत आहे. यामुळे स्मशानभूमींमध्ये नागरिक आणि कर्मचाऱ्यांमध्ये वादावादीचे प्रकारही घडत आहेत.
इराण-अमेरिका युद्धामुळे गॅसपुरवठा अद्याप सुरळीत झालेला नाही. शहरातील नागरिकांकडून ‘इतरत्र गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत असताना स्मशानभूमींना का मिळत नाही?’ असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या पार्श्वभूमीवर शिधावाटप नियंत्रक विभागाकडून कोट्यानुसार आवश्यक सिलिंडर उपलब्ध करून देण्याची मागणी पालिका प्रशासनाने केली आहे. दरम्यान, या समस्येमुळे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांचा रोषही प्रशासनाला सहन करावा लागत आहे.
खर्चात, प्रदूषणात वाढ
लाकडावर अंत्यसंस्कार करण्यासाठी सुमारे चार हजार रुपयांचा खर्च येतो. आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या कुटुंबांसाठी हा खर्च परवडणारा नसल्याने त्यांची मोठी अडचण होत आहे. तसेच, लाकडाच्या वापरामुळे मोठ्या प्रमाणावर धूर निर्माण होऊन प्रदूषणातही भर पडत आहे.
व्यापारी गॅस सिलिंडरचा पुरेसा साठा मिळत नसल्याने गॅस शवदाहिन्या सुरू करता येत नाहीत. यामुळे कल्याण आणि डोंबिवलीमधील गॅस शवदाहिन्या बंद आहेत. शिधावाटप नियंत्रण अधिकाऱ्यांना आम्ही पत्रव्यवहार केले आहेत. तसेच यापुढे कायमस्वरूपी उपाय म्हणून वाहिनीद्वारे गॅस (पीएनजी) पुरवठा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.
- मनोज सांगळे, कार्यकारी अभियंता
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.