

बाजारपेठेत वाहतूक कोंडी
अवजड वाहनांमुळे अपघातांचा धोका वाढला
कासा, ता. ६ (बातमीदार) : डहाणू-जव्हार राज्य मार्गावरील कासा बाजारपेठ परिसरात वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहे. अवजड वाहनांमुळे या मार्गावर अपघाताचा धोकादेखील वाढला असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.
बडोदरा एक्स्प्रेस वे, रेल्वे कॉरिडॉर, बुलेट ट्रेन, वाढवण बंदर तसेच कासा-संजान राज्य मार्गाच्या कामांसाठी दगड, माती, खडी आणि लोखंडी साहित्य वाहून नेणारे शेकडो ट्रक व डम्पर सतत मार्गावर धावत असतात. या अवजड वाहतुकीमुळे कासा, चारोटी आणि गंजाड बाजारपेठ परिसरातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात झीज झाली झाली असून, येथे ठिकठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमधून वेगाने आणि निष्काळजीने वाहतूक होत असून, येथे अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
याशिवाय बाजारपेठ परिसरात रस्त्यालगत उभ्या राहणाऱ्या प्रवासी रिक्षा, दुचाकी आणि दुकानांपुढील गर्दीमुळे कोंडीत आणखी भर पडत आहे. अनेक वेळा अवजड वाहनांवर बांधकाम साहित्य वाहून नेताना आवश्यक सुरक्षा उपाययोजना केलेल्या नसतात. त्यामुळे दगड, खडी किंवा रेती रस्त्यावर पडण्याचा धोका निर्माण होतो. यातून वाहनचालक व पादचारी यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
दरम्यान, स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने रस्त्यांची दुरुस्ती, वाहतूक नियंत्रणासाठी कडक उपाययोजना तसेच अवजड वाहनांसाठी सुरक्षिततेचे नियम सक्तीने लागू करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.
-----------------
महत्त्वाची बाजारपेठ
वाहनांच्या मोठ्या आवाजामुळे परिसरातील वृद्ध, महिला व लहान मुलांना त्रास सहन करावा लागतो. कासा बाजारपेठ ही सुमारे ४० हून अधिक गावांसाठी मुख्य खरेदी केंद्र असल्याने येथे दररोज मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते. तसेच उपजिल्हा रुग्णालय, बँका आणि पोलिस ठाणे यासारख्या महत्त्वाच्या सुविधा बाजारपेठेजवळच असल्याने या मार्गावर सतत वाहतूक कोंडी होत असते.
------------
पालघर जिल्ह्यातील विविध प्रकल्पांसाठी शेकडो अवजड वाहनांची वाहतूक सुरू आहे. त्यामुळे बाजारपेठेत कोंडी आणि अपघातांचा धोका वाढत आहे. रस्ता रुंदीकरण करणे आवश्यक असून, यासाठी पोलिस प्रशासन, बांधकाम विभाग व ग्रामपंचायत स्तरावर उपाययोजना करण्यात आल्या आहेत; मात्र समस्या कायम आहे.
- सुनीता कामडी, सरपंच, ग्रामपंचायत कासा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.