

चांगुलपणा म्हणजेच देवपण
यजुर्वेंद्र महाजन यांचे प्रतिपादन
विरार, ता. ७ (बातमीदार) : चांगुलपणा म्हणजेच देवपण आणि चांगुलपणा आपल्या सर्वात असतो, असे प्रतिपादन दीपस्तंभ फाउंडेशन, मनोबल प्रकल्पाचे संस्थापक यजुर्वेंद्र महाजन यांनी संजीवनी व्याख्यानमालेत ‘चांगला माणूस घडताना’ या विषयावर बोलताना केले. अध्यक्षस्थानी टीआयएफआर मधून निवृत्त झालेले वरिष्ठ विज्ञान अधिकारी मनोज नाईक होते.
यजुर्वेंद्र मास्तरांनी चांगला माणूस म्हणजे काय यावर संवाद साधला. या संवादातून एक एक मूल्य, गुण उलगडून सांगितला. मानवी जीवन आपल्याला लाभले आहे हे सर्वांत महत्त्वाचे. नातेसंबंधाविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, आजकाल आपण वस्तूंवर प्रेम करतो आणि माणसाचा वापर करतो. खरंतर माणसावर प्रेम केले पाहिजे आणि वस्तूचा वापर. चांगला माणूस होण्यासाठी आदरभाव, नम्र, प्रेमळ, संवेदनशील, सेवाभावी आणि प्रामाणिक असणे आवश्यक आहे. चांगला माणूस घडण्यासाठी आपण कुटुंब, समाज म्हणून काही योजना, नियोजन करतो का? चांगल्या माणसाला महत्त्व द्यायला सुरुवात करा, त्यांचा आदर करा, वाईटाला वाईट जर म्हटले नाही आणि समाजाने चांगल्या माणसाला उत्तम वागणूक दिली नाही, तर तुम्ही भविष्यासाठी वाईट समाज निर्माण करत आहात. जीवनमूल्यांची अशी विशेषता आहे की, ती दिली की वाढतात, प्रेम दिलं की प्रेम मिळतं, आदर दिला तर आदर मिळतो, मदत केली तर मदत मिळते.
दीपस्तंभ फाउंडेशनच्या कार्याला सुरुवात कशी झाली हे सांगताना जीवनात चांगले मित्र असणे महत्त्वाचे आहे. माझा मित्र मला स्वामी विवेकानंदांवरील व्याख्यानाला घेऊन गेला. तुम्ही जे ठरवाल ते तुम्ही करू शकाल. जो विचार सातत्याने कराल ज्याच्यावर विश्वास ठेवाल, संपूर्ण झोकून द्याल (समर्पण), तेच तुमच्या जीवनात घडते. तिथून माझ्या जीवनात आमूलाग्र बदल झाला असे त्यांनी सांगितले. यावर्षी दीपस्तंभ फाऊंडेशनला आमदार राजन नाईक, उपमहापौर मार्शल लोपिस, विरोधीपक्ष नेते मनोज पाटील यांच्या हस्ते कृतज्ञता निधी देण्यात आला.