आजपासून घोडबंदरची ‘परीक्षा’

आजपासून घोडबंदरची ‘परीक्षा’
Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ७ : ठाणेकरांसाठी कायमच वाहतूक कोंडीचा विषय ठरणाऱ्या घोडबंदर रोडची उद्या (ता. ८)पासून पुन्हा एकदा ‘परीक्षा’ पाहायला मिळणार आहे. ब्रह्मांड जंक्शन येथील पादचारी पुलावर गर्डर उभारणीचे काम हाती घेण्यात येत असल्याने ८ ते १० मेदरम्यान वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. परिणामी, ब्रह्मांड, मानपाडा, कापूरबावडी तसेच घोडबंदर रोड परिसरात वाहनांच्या रांगांचा सामना करावा लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मुल्लाबाग बस डेपोजवळ उभारण्यात येणाऱ्या पादचारी पुलावर आरपीएस-पीआरएस जॉइंट व्हेंचर कंपनीच्या माध्यमातून गर्डर बसविण्याचे काम करण्यात येणार आहे. हे काम ८ मे रोजी रात्री ११.५५ वाजल्यापासून सुरू होणार असून, १० मे रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत टप्प्याटप्प्याने सुरू राहणार आहे. त्यामुळे ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या निर्देशानुसार वाहतूक विभागाचे पोलिस उपआयुक्त पंकज शिरसाट यांनी वाहतूक बदलाची अधिसूचना जारी केली आहे. या काळात घोडबंदर रोडवरील काही महत्त्वाचे मार्ग बंद ठेवण्यात येणार असल्याने पर्यायी मार्गांवर अतिरिक्त वाहतुकीचा ताण वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः साप्ताहिक सुट्टीच्या पार्श्वभूमीवर घोडबंदर रोडवर नेहमीच मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. त्यातच ब्रह्मांड सिग्नलकडून कापूरबावडीकडे जाणारा मार्ग बंद राहणार असल्याने वाहनचालकांना मोठा वळसा घालावा लागणार आहे.

वाहतूक बदल
मानपाडा उड्डाणपुलाकडे जाणाऱ्या वाहनांनाही प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. वाहतूक विभागाने कापूरबावडीकडे जाणाऱ्या वाहनांसाठी ब्रह्मांड सर्कल, आझादनगर रोड, लोढा आमारा चौक तसेच कोलशेत-ढोकाळी रोडमार्गे पर्यायी व्यवस्था केली आहे, तर घोडबंदर रोडवरून येणाऱ्या वाहनांना टिकुजिनीवाडीमार्गे वळविण्यात येणार आहे.

जड वाहतूक टाळा
जड आणि अवजड वाहनांनी या कालावधीत घोडबंदर रोड टाळावा, असे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे. पोलिस, अग्निशमन दल, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरिडॉर आणि अत्यावश्यक सेवेतील वाहनांना मात्र या निर्बंधांतून सूट देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com