

तुर्भे, ता. ७ (बातमीदार) : जागतिक स्थलांतरित पक्षी दिनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील पर्यावरणप्रेमी संघटना, पक्षी अभ्यासक आणि नागरिक कार्यकर्त्यांकडून फ्लेमिंगोंच्या अधिवासाच्या संरक्षणासाठी शनिवारी (ता. ९) मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. तलाव आणि फ्लेमिंगो वाचवा या संकल्पनेवर हा मोर्चा सकाळी ८ ते ९ या वेळेत सीवूड्स फेज-२ येथील वनश्री इमारतीजवळील एनआरआय तलाव परिसरातून सुरू होऊन डीपीएस फ्लेमिंगो तलाव येथे समाप्त होणार आहे. शहरातील जल क्षेत्रे आणि स्थलांतरित पक्ष्यांवरील वाढत्या पर्यावरणीय धोक्यांविरोधात जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
जागतिक स्थलांतरित पक्षी दिन हा संयुक्त राष्ट्रांच्या पुढाकारातून राबवला जाणारा आंतरराष्ट्रीय जनजागृती उपक्रम असून दरवर्षी १० मे आणि ११ ऑक्टोबरला साजरा केला जातो. नवी मुंबईतील महत्त्वाच्या पाणथळ क्षेत्रांमध्ये गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर पर्यावरणीय बदल झाले आहेत. जलप्रदूषण, स्थिर पाणी, वाढलेले शेवाळ, खालावलेली पाण्याची गुणवत्ता आणि मानवी हस्तक्षेप यामुळे फ्लेमिंगो व इतर स्थलांतरित पक्ष्यांचे अधिवास धोक्यात आले आहेत. फ्लेमिंगोंच्या खाद्य व विश्रांतीच्या अधिवासांचे नुकसान सातत्याने होत राहिल्यास नवी मुंबईतील या स्थलांतरित पक्ष्यांच्या दीर्घकालीन अस्तित्वावर गंभीर परिणाम होऊ शकतो, असा इशारा ‘सेव्ह फ्लेमिंगोज अँड मॅन्ग्रोव्हज मंच’च्या रेखा सांखला यांनी दिला.
फ्लेमिंगोंची अनुपस्थिती
नवी मुंबई पर्यावरण संरक्षण संस्थेचे संदीप सरीन यांनी सांगितले की, यंदा उशिराने का होईना फ्लेमिंगो एनआरआय तलाव परिसरात दिसू लागले आहेत. मात्र, टीएस चाणक्य आणि डीपीएस जलक्षेत्रांमध्ये त्यांची उपस्थिती अद्याप दिसून आलेली नाही.
स्थिर पाणी, अनियंत्रित शेवाळ वाढ आणि खराब पाण्याची गुणवत्ता यामुळे पक्ष्यांसाठी प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी. एन. कुमार यांनी सांगितले की, या मूक मोर्चाद्वारे फ्लेमिंगो आणि इतर स्थलांतरित पक्ष्यांवरील वाढत्या तणावाकडे प्रशासनाचे आणि नागरिकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.