

भिवंडी, ता. ७ (वार्ताहर) : आम्हाला ‘भारत माता की जय’ म्हणण्यात कोणताही कमीपणा वाटत नसून, आमचा विरोध फक्त ‘वंदे मातरम्’ म्हणण्याला आहे, असे प्रतिपादन समाजवादी पक्षाचे प्रदेश सरचिटणीस फरहान आजमी यांनी केले आहे. बुधवारी सायंकाळी पालिका मुख्यालयात समाजवादी पक्षाच्या गटनेता कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
भिवंडी पालिका मुख्यालयातील पक्षाच्या गटनेता कार्यालयाचे उद्घाटन फरहान आजमी यांनी फीत कापून केले. या वेळी रियाज आजमी, गटनेते आरीब याकूब शेख, नगरसेवक, पक्ष पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी त्यांनी ‘भारत माता की जय’चा जयघोष केला. यावर त्यांना विचारले असता त्यांनी भारत माता की जय बोलण्यास आमचा विरोध नाही. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू असीम आजमी यांनीसुद्धा भारत माता की जय याचे समर्थन केले असून, आमचा विरोध वंदे मातरम् म्हणण्यास आहे, असे स्पष्ट केले आहे. समाजवादी पक्षाच्या गटनेता कार्यालयाचे उद्घाटन होत असल्याबद्दल आनंद व्यक्त करीत, यामध्ये सुद्धा काहींनी राजकारण करत अडथळे आणले होते; पण अखेर आयुक्तांनी आमच्या कार्यालयाला हिरवा कंदील दाखवला. या कार्यालयातून शहरातील नागरिकांना न्याय देण्याचे काम होईल, या कार्यालयातून जनतेच्या सेवेसाठी काम होईल, असा विश्वास फरहान आजमी यांनी व्यक्त केला.
नागरी समस्यांवर बोला
समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख कुठे आहेत, हे आम्हीच आता शोधत आहोत. त्यांच्या छातीवर ते आता समाजवादी पक्षाचा बिल्ला नाही लावत. ज्या पक्षाने त्यांना ओळख दिली, आमदार म्हणून निवडून दिले. त्यांना मत देताना नागरिकांनी रईस शेख यांना नाही तर सायकल या चिन्हावर मतदान केलं आहे. आम्ही आता सायकलवर फिरवून त्यांना शोधण्याचा प्रयत्न करू, असा उपरोधिक टोला लगावत फरहान आजमी यांनी रईस शेख यांना पक्षाने कारणे दाखवा नोटीस दिली आहे. त्याचे उत्तर देताना त्यांनी दिलेले कारणे न पटणारी आहेत. भिवंडीत भ्रष्टाचार वाढला असताना विरोधातील समाजवादी पक्षाचा आमदार सरकारचे गुणगान करीत आहे, हे हास्यास्पद असल्याची टीका करीत येथील जनतेच्या नागरी समस्यांवर न बोलता आमदार रईस शेख भाजपचे आमदार झाल्याचे वाटत आहे, अशी टीका फरहान आजमी यांनी आमदार रईस शेख यांच्यावर केली आहे.
भिवंडी : पालिका मुख्यालयातील पक्षाच्या गटनेता कार्यालयाचे उद्घाटन फरहान आजमी यांनी फीत कापून केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.