

माॅन्सूनपूर्व तयारीला वेग
कौलारू घरांच्या दुरुस्तीला सुरुवात, रिपाट ठोकण्याची लगबग
विक्रमगड, ता. ७ (बातमीदार) : मॉन्सून जवळ येताच कोकणातील कौलारू घरांच्या दुरुस्तीला सुरुवात होते. विक्रमगड तालुक्यातही अशीच कौलारू घरांच्या दुरुस्तीच्या कामाला वेग आला असून, अनेक ठिकाणी घरांमध्ये नवीन कवल (कौल) बसवणे आणि रिपाट (लाकडी) ठोकण्याच्या कामांनी जोर घेतला आहे.
विक्रमगडमध्ये आजही अनेक ठिकाणी टुमदार कौलारू घरे पाहण्यास मिळतात. त्यामुळे येथील गावपण टिकून आहे. अशात पावसाळा आला की, कौलारू घरांची डागडुजी खूप महत्त्वाची असते. एप्रिल-मे महिन्यात उन्हाती तीव्रता वाढताच, कौल सुकवणे, त्यांची स्वच्छता करणे आणि ते व्यवस्थित रचून बसवण्याचे काम हाती घेतले जाते.
गावातील कुशल कारागीर, मजूर आणि स्थानिक कामगार यांना या काळात रोजगाराची संधी उपलब्ध होत असते. कौल बसवणे, रिपाट ठोकणे, छपराची मजबुतीकरण, त्यावर काही ठिकाणी डांबर टाकण्याचे कामही या काळात वाढलेले असते. यातून अनेकांना रोजगार उपलब्ध होतो. पावसाळ्यात घरात गळती होऊ नये म्हणून आम्ही दरवर्षी आधीच कौलांची डागडुजी करतो. यंदा उन्हाळा जास्त असल्याने काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न असल्याची माहिती विलास मोरघा यांनी दिली, तर याबाबत रेखा मोरघा यांनी सांगितले की, घरावर रिपाट ठोकल्यामुळे पावसाचे पाणी आत येत नाही आणि घर थंडही राहते. त्यामुळे ही तयारी खूप महत्त्वाची असते.
-----------------
दुरुस्तीच्या खर्चात वाढ
कौल, माती, मजुरी यांचे दर वाढल्याने या दुरुस्तीचा खर्च वाढला असला तरी पावसाळ्यातील अडचणी टाळण्यासाठी ग्रामस्थ ही तयारी अपरिहार्य मानत आहेत. काही ठिकाणी शासकीय योजनांतर्गत घरकुल लाभार्थीदेखील आपली घरे मजबूत करण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. विक्रमगड तालुक्यातील ग्रामीण भागात मॉन्सूनपूर्व तयारीला वेग आला असून, घरांची सुरक्षितता आणि पावसाळ्यातील त्रास टाळण्यासाठी ग्रामस्थांची धडपड सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.