

वसई-विरार शहरातील रस्त्यांचे राजकारण तापले
मुख्य मार्गावर संताप व्यक्त करणारे झळकले बॅनर
वसई, ता. ७ (बातमीदार) : वसई-विरार शहरात अनेक मार्गांची दुरवस्था झाली आहे. वाहतूक कोंडी, अपघात, प्रवास करताना खड्ड्यांचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. याबाबत चीड, संताप व्यक्त करणारे बॅनर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने वसईच्या मार्गावर लावले असून, नागरिकांचे लक्ष वेधले आहे. आंदोलन किंवा महापालिकेला धडक देण्याऐवजी नवी युक्ती ठाकरे गटाने आजमावली असल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे.
वसई-विरार शहरात अनेक विकासात्मक कामे सुरू आहेत. या वेळी रस्ते खोदणे, माती ढिगारे रस्त्याच्या कडेला टाकले जात आहेत. तसेच अनेक मार्गांची अवस्था बिकट आहे. रस्त्यांवर पडलेले खड्डे प्रवासाला अडथळा निर्माण करत आहेत. त्यामुळे वाहनांचा अपघात होत आहे, तर अनेक रस्त्यांचे काम केल्यावर डांबरीकरण पूर्ण झाले नसल्याने रस्ते खडबडीत असून, त्यावर प्रवास करताना वाहनचालकांना सावधानता बाळगावी लागत आहे. त्यातच अनेक मार्गावर वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे औद्योगिक वसाहतीत ये-जा करणाऱ्या कामगारांसह, वाहनांना कोंडीतून बाहेर पडण्यासाठी अधिक वेळ लागत असतो. सिमेंट काँक्रीटीकरणाचे रस्ते होणार, अशी ग्वाही जरी प्रशासनाकडून दिली जात असली, तरी सद्यःस्थितीत मात्र नागरिकांचा प्रवास हा समस्येने घेरला आहे.
वसई-विरार शहर महापालिकेच्या क्षेत्रात येणाऱ्या प्रमुख तसेच अंतर्गत मार्गावर नादुरुस्त रस्ते दुरुस्त करावेत व प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी मिळावी, यासाठी जरी शिवसेनेने बॅनर लावून प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला असला तरी रस्ते दुरुस्त केव्हा होणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
--------------
‘रील्सवर विकास, ग्राउंडवर विनाश’, ‘रील नाही, काम दाखवा’, ‘१२ कोटींचा रस्ता की, १२ कोटींचा तमाशा?’, ‘खड्डे भरले नाहीत, तर कोणाचे खिसे भरले’, ‘आमदार, खासदार, महापौर यांना रस्त्याचे खड्डे दिसत नाहीत का?’, ‘ जनतेच्या पैशांचा हिशोब द्या’ असे मजकूर असलेले बॅनर शिवसेना ठाकरे गटाचे वसई शहरप्रमुख तथा माजी नगरसेवक संजय गुरव यांनी लावले आहेत.
--------------------
वसई-विरार शहरात नागरिकांचा प्रवास सुरक्षित, सुखद असावा यासाठी लोकप्रतिनिधींची, प्रशासनाची जबाबदारी आहे. मात्र, अनेक मार्ग हे नादुरुस्त आहेत. त्यामुळे नागरिकांना समस्या भेडसावत आहेत. याकडे लक्ष द्यावे म्हणून बॅनरमधून संदेश देण्याचा प्रयत्न केला. आता तरी डोळे उघडून, सुसज्ज रस्ते तयार करतील ही अपेक्षा आहे.
- संजय गुरव, वसई शहरप्रमुख व माजी नगरसेवक
---------------
वसई : पूर्वेकडील औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या मार्गावर लक्ष वेधत असलेले बॅनर.