

नेरूळमध्ये पार्किंगची वाढती समस्या
स्टेडियम, रुग्णालये व महाविद्यालयांमुळे वाढती गर्दी; वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त
जुईनगर, ता. ७ (बातमीदार): नेरूळ परिसरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या पार्किंग समस्येमुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होत असून प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे. डी. वाय. पाटील स्टेडियम, रुग्णालय, शैक्षणिक संकुल तसेच एसआयईएस महाविद्यालय या मोठ्या संस्थांमुळे परिसरात वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
दररोज हजारो विद्यार्थी, रुग्ण, कर्मचारी आणि नागरिक येथे ये-जा करीत असल्याने पार्किंगची उपलब्ध जागा अपुरी पडत आहे. पूर्वी संस्थांच्या आवारात काही प्रमाणात पार्किंगची व्यवस्था होती, मात्र सध्या बहुसंख्य वाहने रस्त्याच्या दुतर्फा उभी राहत असल्याने वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका वाढला आहे.
विशेषतः स्टेडियममध्ये सामने किंवा मोठे कार्यक्रम आयोजित झाल्यानंतर मुख्य रस्त्यांवर निर्बंध लावले जातात. त्यामुळे स्थानिक रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो. सार्वजनिक रस्त्यांवर अशा प्रकारे निर्बंध लावणे योग्य नसल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित संस्थांनी त्यांच्या आवारात पुरेशी पार्किंग व्यवस्था उभारावी, मुख्य रस्त्यांवरील दुतर्फा पार्किंगवर नियंत्रण आणावे आणि कार्यक्रमांदरम्यान योग्य वाहतूक नियोजन करावे, अशी मागणी काँग्रेस पदाधिकारी संतोष सुतार यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
महापालिका, वाहतूक पोलीस आणि संबंधित संस्थांनी संयुक्तपणे ठोस उपाययोजना राबवून ही समस्या सोडवावी, अन्यथा नागरिकांचा रोष वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
चौकट
समन्वयाचा अभाव
नेरूळमधील पार्किंग समस्येचे मुख्य कारण म्हणजे महापालिका, वाहतूक पोलीस आणि संबंधित संस्थांमध्ये समन्वयाचा अभाव. स्वतंत्रपणे उपाययोजना केल्याने समस्या सुटत नाही. मोठ्या कार्यक्रमांच्या वेळी योग्य वाहतूक नियोजन, पर्यायी पार्किंग व्यवस्था आणि स्पष्ट सूचना फलक आवश्यक आहेत. सर्व यंत्रणांनी एकत्रित कृती आराखडा तयार करून अंमलबजावणी केल्यासच ही समस्या प्रभावीपणे सोडवता येऊ शकते.
कोट
दिवसेंदिवस या परिसरात पार्किंग समस्या फारच गंभीर होत चालली आहे. परिणामी स्थानिक नागरिकांच्या जीवनशैलीवर प्रचंड परिणाम होत असल्याने या ठिकाणी प्रशासनाने उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे.
संतोष सुतार, उपाध्यक्ष, नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.