‘त्या’ दिवसांचा त्रास होणार कमी

‘त्या’ दिवसांचा त्रास होणार कमी
Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ७ : मासिक पाळी अनियमित होणे, हार्मोनल बदल, वजन वाढणे, मानसिक ताणतणाव अशा समस्यांनी त्रस्त महिलांसाठी ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात ‘पीसीओडी क्लिनिक’ सुरू करण्यात आले आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे वाढणाऱ्या ‘पीसीओडी’ (पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसऑर्डर) या समस्येवर वेळीच निदान आणि उपचार उपलब्ध व्हावेत, या उद्देशाने राज्य सरकारच्या आरोग्य विभागामार्फत हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
पीसीओडी क्लिनिकमुळे दर महिन्याला होणाऱ्या त्रासातून दिलासा मिळण्यास मदत होणार आहे. या क्लिनिकची सुरुवात जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी करण्यात आली. या वेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, निवासी वैद्यकीय अधिकारी बाह्य संपर्क, स्त्रीरोग तज्ज्ञ; तसेच अधिसेविका उपस्थित होत्या. उपस्थित तज्ज्ञांनी यावेळी महिलांना पीसीओडीच्या वाढत्या समस्येविषयी, त्याची लक्षणे आणि उपचारपद्धती याबाबत मार्गदर्शन केले.

पीसीओडी म्हणजे काय?
जीवनशैली, वाढता ताण, जंक फूडचे वाढते सेवन आणि व्यायामाचा अभाव यामुळे तरुणींमध्ये पीसीओडीचे प्रमाण वाढत आहे. मासिक पाळी अनियमित होणे, वजन वाढणे, चेहऱ्यावर केस येणे, त्वचेच्या समस्या आणि भविष्यात गर्भधारणेत अडचणी निर्माण होणे ही या विकाराची प्रमुख लक्षणे असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

दर बुधवारी मिळणार सेवा
हे क्लिनिक जिल्हा रुग्णालयात दर बुधवारी ‘मेनोपॉज ओपीडी’सोबत नियमित सुरू राहणार आहे. या ठिकाणी महिलांना स्त्रीरोग तज्ज्ञांकडून तपासणी, हार्मोनल चाचण्या, औषधोपचार, मानसिक समुपदेशन; तसेच आहार आणि जीवनशैलीविषयक मार्गदर्शन दिले जाणार आहे. उद्‍घाटनानंर क्लिनिकमध्ये आलेल्या महिलांची प्रत्यक्ष तपासणी करून त्यांना आवश्यक औषधोपचार आणि समुपदेशन करण्यात आले. जिल्हा रुग्णालयातील या सुविधेचा लाभ अधिकाधिक महिलांनी घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com