

समग्रच्या आंदोलकांकडून मुंडन करण्याचा इशारा
दिवसभर गजरे लावून केला राज्य सरकारचा निषेध
मुंबई, ता. ७ : राज्यातील शालेय शिक्षण विभागाच्या विविध कार्यालयात कार्यरत मागील १० वर्षांहून अधिक काळ असलेल्या समग्र शिक्षा अभियानातील कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानात सुरू केलेल्या आंदोलनाला मंगळवारी (ता. ५) ६० दिवस पूर्ण झाले आहेत. दरम्यान, सरकारकडून कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याचे सांगत आंदोलनकर्त्यांकडून बुधवारी (ता. ६) मुंडन आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. मुंडन करणार असल्याचे सांगत काही महिला आंदोलनकर्त्यांनी मंगळवारी आझाद मैदानात आपल्या केसांमध्ये गजरे लावून गजरा आंदोलन छेडल्याची माहिती आंदोलकर्त्या साक्षी सांगळे यांनी सांगितली.
समग्र शिक्षा संघर्ष समितीकडून आझाद मैदानावर ९ मार्चपासून हे आजपर्यंत आंदोलन छेडले जात असून, या आंदोलनाला ६० दिवस पूर्ण झाले आहेत.
राज्यात महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेमार्फत ‘समग्र शिक्षा’ अभियान राबवले जाते. यात तीन हजार ३८४ कर्मचारी करार तत्त्वावर, तर ३६८ कर्मचारी बाह्य संस्थांकडून कंत्राटी तत्त्वावर कार्यरत होते. मात्र, अभियानाचीच मुदत संपल्याने राज्य विधानमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर या अभियानातील कर्मचारी संघटनांनी आझाद मैदानात आंदोलन सुरू केले होते. त्यांनी आपल्याला सेवेत कायम करण्याची मागणी लावून धरली आहे. मात्र, या मागणीकडे सरकार लक्ष देत नसल्याचा दावा आंदोलनकर्त्यांकडून केला जात आहे.
समग्र शिक्षामध्ये मागील २० वर्षांपासून कार्यरत असलेल्या अनेक कर्मचाऱ्यांचा काही वर्षांमध्ये मृत्यू झाला, परंतु शासनाकडून या कर्मचाऱ्यांना एक रुपयाचीही आर्थिक मदत मिळालेली नाही, अशी असंख्य प्रकरणे असून, ते आज कोणत्याही मदतीपासून वंचित असले तरी सरकारकडून याची गंभीर दखल घेतली जात नसल्याचे सांगण्यात आले.
------------------
अशा आहेत मागण्या
समग्र शिक्षा अभियानात मागील १० वर्षांहून अधिक काळ राज्यभरात तब्बल तीन हजार ३८७ कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. त्या सर्व कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने सेवेत समायोजित करून त्यांना कायम करण्याची मागणी केली जात आहे. यासाठी आमदारांची समितीही नेमण्यात आली होती. या समितीने सरकारला सकारात्मक अहवाल दिला असल्याचे सांगण्यात येते. सरकारकडून जोपर्यंत आम्हाला कायम केले जात नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे आंदोलनकर्त्यांकडून सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.