

‘क्षयमुक्त भारत’ १०० दिवसांची मोहीम
७,९०१ नागरिकांना आरोग्य शिबिरांचा लाभ
वाशी, ता. ७ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत ‘क्षयमुक्त भारत’ या राष्ट्रीय उद्दिष्टासाठी १०० दिवसांची विशेष मोहीम राबविण्यात येत असून नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. २४ मार्च रोजी सुरू झालेल्या या अभियानाअंतर्गत आतापर्यंत ७९ आयुष्मान आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आली असून ७,९०१ नागरिकांनी त्याचा लाभ घेतला आहे.
या मोहिमेत ६० वर्षांवरील नागरिक, मधुमेहग्रस्त, तसेच क्षयरुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींवर विशेष लक्ष केंद्रित केले जात आहे. शिबिरांमध्ये छातीच्या एक्स-रेद्वारे तपासणी, मोफत निदान व औषधोपचार, तसेच ‘निःक्षय पोषण योजना’अंतर्गत सहाय्य दिले जात आहे.
याशिवाय मधुमेह, उच्च रक्तदाब व कुष्ठरोग तपासणीही केली जात असून शाळा व समाजस्तरावर जनजागृती कार्यक्रम राबविले जात आहेत. क्षयरोग हा पूर्णपणे बरा होणारा आजार असल्याने लक्षणे दिसताच त्वरित तपासणी करून घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.