ठाण्यात १४ दरडप्रवण क्षेत्र

ठाण्यात १४ दरडप्रवण क्षेत्र
Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ७ : पावसाळ्याच्या काळात दरड कोसळून होणारी जीवितहानी टाळण्यासाठी ठाणे पालिका प्रशासन सतर्क झाला आहे. यंदाही धोकादायक ठिकाणांची यादी जाहीर करण्यात आली असून दरड कोसळण्याचा धोका असलेल्या भागांतील रहिवाशांना पुन्हा एकदा सतर्कतेचा इशारा दिला आहे. मान्सूनपूर्वी घरे रिक्त करण्याच्या नोटिसा देण्यास सुरुवात झाली आहे. ठाणे पालिका क्षेत्रात १४ ठिकाणे सध्या दरडप्रवण म्हणून घोषित करण्यात आली आहेत. या परिसरांमध्ये हजारो नागरिक जीव धोक्यात घालून राहतात.
मान्सूनकाळात भूस्खलन किंवा दरड कोसळण्याच्या घटना घडण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. यासंदर्भात नुकतीच मान्सूनपूर्व आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत नाल्यालगत, डोंगर उतारावर आणि डोंगरपायथ्याशी असलेल्या झोपडपट्ट्यांचा विशेष आढावा घेण्यात आला. संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रभाग समिती स्तरावर संबंधित रहिवाशांना नोटिसा बजावून सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
दरम्यान, या संदर्भात ठाणे महापालिकेचे उपायुक्त गजानन गोदेपुरे यांना विचारले असता, दरडप्रवण भागांतील नागरिकांना मान्सूनपूर्वी सुरक्षितस्थळी हलविण्याच्या सूचना सर्व प्रभाग समित्यांना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार सहाय्यक आयुक्तांकडून रहिवाशांना घरे रिक्त करण्याच्या नोटिसा दिल्या जात आहेत. नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
…………..
धोकादायक ठिकाणे
लोकमान्यनगर परिसरातील गुरुदेव आश्रमजवळील वसाहती, उपवन परिसर, माजीवडा-मानपाडा भागातील डोंगरीपाडा, पातलीपाडा आणि कळशीपाडा यांचा समावेश आहे. कळवा परिसरातील आतकोनेश्वर नगर, पौंडपाडा, शिवशक्ती नगर, घोलाई नगर, वाघोबा नगर आणि भास्कर नगर हे भागही धोकादायक म्हणून चिन्हांकित करण्यात आले आहेत. तसेच मुंब्रा परिसरातील आझादनगर, गावदेवी मंदिर परिसर, केणी नगर, सैनिक नगर आणि कैलास नगर या भागांचाही यामध्ये समावेश आहे.
………….
२६ वरून १४ वर
पालिका क्षेत्रात पूर्वी दरड प्रवण क्षेत्र व धोकादायक ठिकाणांची संख्या २६ होती. काही उपाययोजनांनंतर ती घटून १४ वर आली असली तरी अजूनही अनेक नागरिक तेथेच राहत असल्याचे दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com