

घाटकोपरच्या लक्ष्मीबाग नाल्याची अद्याप सफाई नाही
घाटकोपर, ता. ७ (बातमीदार) : घाटकोपर पूर्व येथील लक्ष्मीबाग नाला, पंतनगर परिसरातील प्रमुख मोठ्या नाल्यांपैकी एक मानला जातो. या नाल्यामधून घाटकोपर पूर्व आणि पश्चिम भागातील पावसाच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात निचरा होत असतो. मात्र, मे महिना सुरू होऊनही अद्याप या नाल्याची प्रभावी साफसफाई झालेली दिसून येत नसल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
मॉन्सून काही दिवसांवर येऊन ठेपला असताना नाल्यात मोठ्या प्रमाणात गाळ, कचरा आणि झाडाझुडपांचे अडथळे कायम असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. दरवर्षी मुसळधार पावसामुळे लक्ष्मीनगर, लक्ष्मीबाग आणि आसपासच्या सखल भागांमध्ये पाणी साचण्याच्या घटना घडत असतात. त्यामुळे यंदाही नागरिकांना पाणी तुंबण्याच्या संकटाला सामोरे जावे लागणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, प्रशासनाकडून दरवर्षी नालेसफाईचे दावे केले जात असले तरी प्रत्यक्षात अनेक ठिकाणी कामे अपुरी राहतात. विशेषतः मोठ्या नाल्यांमधील गाळ पूर्णपणे काढला जात नसल्याने पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह मंदावतो आणि पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका वाढतो.
या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे माजी उपविभागप्रमुख महेश जंगम यांनी महापालिका प्रशासन आणि ‘एन’ विभाग अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले आहे. त्यांनी प्रशासनाने तातडीने लक्ष्मीबाग नाल्याची संपूर्ण साफसफाई करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली आहे. महेश जंगम म्हणाले की, मॉन्सूनपूर्व नालेसफाई ही केवळ कागदोपत्री न राहता प्रत्यक्षात प्रभावीपणे होणे आवश्यक आहे. लक्ष्मीनगर आणि लक्ष्मीबाग परिसरातील नागरिकांना पाणी भरण्याच्या परिस्थितीला सामोरे जावे लागू नये, यासाठी महापालिका प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात.