

थोडक्यात
---
मानलेल्या पित्याचे अल्पवयीन मुलीशी अश्लील वर्तन
भाईंदर (बातमीदार) : मानलेल्या पित्याचे १७ वर्षीय मुलीशी अश्लील वर्तन केल्याची घटना उत्तन येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मानलेल्या पित्याला अटक केली आहे. अल्पवयीन पीडित मुलगी उत्तन येथे आपली आई व मानलेल्या पित्यासोबत राहते. आरोपी वडील पीडित मुलगी व तिच्या आईशी अश्लील वर्तन करून वेळोवेळी शिवीगाळ करत असे व दोघींना धमकी देत असे. अखेर पीडितेने बुधवारी (ता. ६) रात्री उत्तन सागरी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली, त्यानंतर पोलिसांनी आरोपीविरोधात बाललैंगिक अत्याचारविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
---
आई रागावल्याने तरुणाची आत्महत्या
मनोर (बातमीदार) : सफाळे पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मोरवणे धरणात एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. यज्ञेश प्रमोद सांबरे (रा. नारोडा) असे मृत तरुणाचे नाव आहे. आई रागावल्याचे मनाला लागल्याने त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. गुरुवारी सकाळी धरणात त्याचा मृतदेह आढळून आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणी सफाळे पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.
---
पालघरमध्ये चक्कर आल्याने महिलेचा मृत्यू
मनोर (बातमीदार) : पालघर तालुक्यातील वरई फाटा परिसरात गुरुवारी (ता. ७) दुपारी एका महिलेचा अचानक मृत्यू झाल्याची घटना घडली. संबंधित महिला सफाळेकडे जाण्यासाठी एसटी बसमध्ये चढत असताना तिला अचानक चक्कर आली. अस्वस्थ वाटल्याने ती माघारी फिरली; मात्र काही क्षणांतच रस्त्यालगत कोसळली. उपस्थितांनी मदतीचा प्रयत्न केला; परंतु तिचा जागीच मृत्यू झाला. तीव्र उष्णतेमुळे उष्माघाताचा प्रकार असण्याची शक्यता व्यक्त होत आहे; मात्र मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रामदास मराड यांनी दिली. मृत महिलेची ओळख अद्याप पटलेली नसून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन मनोर ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे.
---
मिरा रोडमध्ये १३ कोटींचा एमडी जप्त
भाईंदर (बातमीदार) : मिरा-भाईंदर-वसई-विरार पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने मोठी कारवाई करत १३ कोटी ६१ लाख रुपये किमतीचा सहा किलो ७७३ ग्रॅम एमडी अमली पदार्थ जप्त केला आहे. याप्रकरणी अमली पदार्थांची खरेदी-विक्री करणाऱ्या टोळीतील अनेक आरोपींना अटक करण्यात आली आहे. मिरा रोडच्या नयानगर परिसरात छापा टाकून सुरुवातीला एका महिलेच्या घरातून एमडी जप्त करण्यात आला. चौकशीतून आणखी आरोपींची नावे समोर आल्यानंतर पोलिसांनी विविध ठिकाणी कारवाया केल्या. आरोपींकडून अमली पदार्थांचे जाळे उघड करण्याचा तपास सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.