मुंबई–वडोदरा एक्सप्रेसवेचे काम रखडले

मुंबई–वडोदरा एक्सप्रेसवेचे काम रखडले
Published on

मुंबई-बडोदा प्रवासात विघ्न
वैतरणा, सावरोळी पुलांचे काम अपूर्ण, एप्रिल २०२६ची मुदत हुकली

कासा, ता. ८ (बातमीदार) ः पालघर जिल्ह्यातून मुंबई-बडोदा महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे; मात्र गुजरातमधील सावरोळी येथील तर पालघर जिल्ह्यातील वैतरणा नदीवरील पुलाचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे जूननंतर हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
मुंबई-बडोदा महामार्ग देशातील महत्त्वाच्या द्रुतगती मार्गांपैकी एक आहे. महाराष्ट्र, गुजरात तसेच दादरा-नगर हवेली केंद्रशासित प्रदेशाला जोडणारा हा मार्ग वाहतूक व्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. पालघर जिल्ह्यातील वसई, पालघर, डहाणू, तलासरी तालुक्यातील ५१ गावांतून हा मार्ग जात आहे. या मार्गावर वाहनांना ताशी १२० किलोमीटर वेगाने प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार आहे. सध्या गंजाड येथील नाशिक-डहाणू राज्य मार्गावरील इंटरचेंजचे काम वेगाने सुरू असून डहाणू, बोर्डी, उंबरगाव, वानगाव, चिंचणी, वाढवण तसेच चारोटीमार्गे जव्हार, वाडा, विक्रमगड, ठाणे, नाशिक भागांतील वाहनांना मोठा फायदा होणार आहे.
--------------------------------
चालकांना अडचणींचा फेरा
पालघर जिल्ह्यात मासवण, गंजाड येथे महामार्गावरील चढ-उतारासाठी इंटरचेंज उभारण्यात येत आहेत; मात्र तारापूर औद्योगिक वसाहतीसाठी मासवण इंटरचेंज फारसे सोयीचे नसल्याने बोईसरमधील नागझरी येथे स्वतंत्र इंटरचेंजची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील काँक्रीट रस्त्यांवरील खड्डे, पुलांवरील अपूर्ण कामांमुळे वाहनचालकांना कोंडी, अपघातांच्या घटनांना सामोरे जावे लागत आहे.
-----------------------------
पाच तासांचा प्रवास
मुंबई-अहमदाबाद हा ५५० किलोमीटरचा प्रवास पूर्ण करण्यासाठी १० ते १२ तास लागतात; मात्र महामार्गामुळे हे अंतर ३७९ किलोमीटरवर येणार आहे. अवघ्या साडेतीन ते पाच तासांचा प्रवास करता येणार आहे. या मार्गावर ३४ टोल प्लाझा, २४ फ्लायओव्हर, १,४७६ भुयारी मार्ग उभारण्यात येत आहेत.
---------------------
मुंबई-अहमदाबाद महामार्गाचे काँक्रीटीकरण झाले असले तरी प्रवास त्रासदायक आहे. अनेक भागांत अपघातांचे प्रमाण कायम आहे. त्यामुळे महामार्ग सुरू झाल्यास वाहनचालकांना दिलासा मिळेल.
- चिन्मय घारपुरे, व्यापारी
-------------------------
पालघर जिल्ह्यातील वैतरणा पुलाचे काम जूनपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. तलासरी ते शिरसाटपर्यंतचा मार्ग वाहतुकीसाठी सुरू करण्याची तयारी आहे; मात्र गुजरातमधील सावरोळी येथील पुलाचे काम अपूर्ण आहे.
- सुहास चिटणीस, महामार्ग प्रबंधक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com