

घाटकोपर मेट्रो स्थानकावर पंखे, लिफ्टमध्ये सीसीटीव्हीची मागणी
घाटकोपर, ता. ८ (बातमीदार) : वाढत्या उष्णतेमुळे घाटकोपर मेट्रो स्थानकावर प्रवाशांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत असून, प्रवाशांच्या सुविधा आणि सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
शिवसेना नेते तथा सचिव आणि ग्राहक संरक्षण कक्षाचे अध्यक्ष खासदार अनिल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली, ग्राहक संरक्षण कक्षाचे सरचिटणीस निखिल सावंत व उपाध्यक्ष अशोक शेंडे यांच्या सूचनेनुसार, घाटकोपर (प.) विधानसभा कक्षाचे संघटक यशवंत खोपकर यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांतर्गत मुंबई मेट्रो लाइन-१चे स्टेशन कंट्रोल व्यवस्थापक साहिल मायेकर यांची भेट घेत निवेदन सादर केले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मुंबईतील तापमानात वाढ होत असल्याने घाटकोपर मेट्रो स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर उभे राहताना प्रवाशांना तीव्र उकाडा सहन करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांना घाम, अस्वस्थता आणि त्रास जाणवत असून, स्टेशन परिसरात अतिरिक्त पंखे बसविण्याची मागणी करण्यात आली.
तसेच महिला आणि सर्वसामान्य प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने स्थानकातील लिफ्टमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे अत्यावश्यक असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले. सध्या लिफ्टमध्ये सीसीटीव्ही सुविधा नसल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. भविष्यात कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी तातडीने ही सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. या वेळी ग्राहक संरक्षण कक्षाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.