माहिममधील दोन सोसायट्यांचा डीम्ड कन्व्हेयन्सचा मार्ग मोकळा

माहिममधील दोन सोसायट्यांचा डीम्ड कन्व्हेयन्सचा मार्ग मोकळा
Published on

माहीममधील दोन सोसायट्यांचा हस्तांतरणाचा मार्ग मोकळा

घाटकोपर, ता. ८ (बातमीदार) : माहीम येथील श्री बाळगोविंद आणि न्यू बाळगोविंद सहकारी गृहनिर्माण संस्थांना उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. मानीव अभिहस्तांतरणा (डीम्ड कन्व्हेयन्स)साठी सादर केलेले अर्ज तब्बल दोन वर्षे प्रलंबित ठेवल्यानंतर उपनिबंधकांनी ते फेटाळले होते. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने उपनिबंधकांचे हे आदेश रद्द करत आठ आठवड्यांत निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत.

माहीमच्या टायकलवाडी मार्गावर एकाच भूखंडावर असलेल्या श्री बाळगोविंद आणि न्यू बाळगोविंद या दोन्ही स्वतंत्र सहकारी गृहनिर्माण संस्थांनी राज्य शासनाच्या विशेष मोहिमेंतर्गत ७ ऑगस्ट २०२३ रोजी मानीव अभिहस्तांतरणासाठी अर्ज दाखल केले होते. शासन निर्णयानुसार तीन महिन्यांत अर्ज निकाली काढणे बंधनकारक असताना, सक्षम प्राधिकारी व जिल्हा उपनिबंधकांनी दोन वर्षांत १३ वेळा सुनावण्या घेतल्या. दरम्यान, संस्थेच्या एका सदस्याचा हस्तक्षेपकर्ता म्हणून अर्ज दाखल करून घेतला गेला. मात्र, उच्च न्यायालयाच्या पूर्वीच्या निर्णयानुसार संस्थेचा सदस्य मानीव अभिहस्तांतरण प्रक्रियेत हस्तक्षेपकर्ता होऊ शकत नाही. तरीही हा अर्ज नऊ महिन्यांनंतर निकाली काढण्यात आला.
----------------
उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

दोन्ही संस्थांनी वारंवार स्मरणपत्रे देऊनही निर्णय न झाल्याने व अखेरीस दोन वर्षांनी अर्ज फेटाळल्याने संस्थांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायमूर्ती अमित बोरकर यांनी उपनिबंधकांचा आदेश रद्द केला. दोन्ही संस्थांच्या वास्तुरचनाकारांनी परिसराबाबतचे प्रमाणपत्र सादर करावे, सक्षम प्राधिकाऱ्याने दोन्ही गृहनिर्माण संस्थांची बाजू ऐकून शासन निर्णय २२ जून २०१८ नुसार निश्चित भूखंड अभिनिर्णित करावा, याव्यतिरिक्त अन्य कोणत्याही बाबींची चौकशी करू नये, आठ आठवड्यांत अंतिम निर्णय द्यावा, असे सांगण्यात आले.
--------------
संस्थांना दिलासा
उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे बाळगोविंद आणि न्यू बाळगोविंद सोसायटीचा मानीव अभिहस्तांतरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. निकालाची प्रत देण्यासही टाळाटाळ करणाऱ्या उपनिबंधकांच्या कारभारावर न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. आता आठ आठवड्यांत प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित आहे. सोसायटीच्या वतीने ॲड. हकानी, ॲड. मंगेश परब, ॲड. ऋषीकेश काकाने, ॲड. संतोष तावडे यांनी सोसायटीची बाजू भक्कमपणे मांडली, असे न्यू बाळगोविंद सोसायटीचे खजिनदार महेश मोरे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com