

भिवंडी, ता. ८ (बातमीदार) : भिवंडी शहरात येत्या २७ ते २९ मे २०२६ दरम्यान मुस्लिम बांधवांचा बकरी ईद हा धार्मिक सण साजरा होणार आहे. यानिमित्ताने महापालिका मुख्यालय उपायुक्त विक्रम दऱ्हाडे यांनी आयुक्तांच्या आदेशानुसार महापौर नारायण चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली महापौर दालनात पालिकेत कार्यरत असलेल्या विविध कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची विशेष स्वच्छतेबाबत महत्त्वाची बैठक आयोजित केली होती. मात्र, या बैठकीस आयुक्त अनमोल सागर यांच्यासह कोणीही वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहिले नाही. त्यामुळे महापौर नारायण चौधरी आणि कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत स्वच्छतेविषयी जुजबी चर्चा करीत ही बैठक आटोपती घेतली.
महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी यावर्षी बकरी ईदच्या दिवशी जनावरांच्या कुर्बानीनंतर उरलेला कचरा उचलणार नाहीत, अशी भूमिका सफाई कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी महापौर नारायण चौधरी, उपमहापौर तारिक मोमीन आरोग्य स्वच्छता विभागाचे अधिकारी फैजल तातली यांच्या समोर मांडली. तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशाचा हवाला देत संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले, की जनावरांची कुर्बानी दिल्यानंतर कुर्बानी सेंटरमधून उरलेला अपशिष्ट व इतर कचराही उचलावा. तसेच त्यांनीच तेथे स्वच्छता करावी, अशी मागणी कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी महापौरांकडे केली आहे. त्यामुळे महापालिका महापौर, आयुक्त व प्रशासनासमोर गंभीर संकट निर्माण झाले आहे. याबाबत महापौर यांनी पुन्हा एकदा आयुक्त प्रशासनाबाबत चर्चा करून निर्णय घेऊ, असे सांगत ही बैठक संपविली. या बैठकीस पालिकेच्या १८ कामगार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
महापालिकेत झालेल्या बैठकीत केलेल्या मागण्या
१) भिवंडी मनपाच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या तात्पुरत्या कुर्बानी सेंटरपर्यंत वाहने जातील अशी सुविधा करण्यात यावी, जेणेकरून कुर्बानी झालेल्या जनावरांची अपशिष्ट उचलून गाडीपर्यंत नेण्यास कर्मचाऱ्याऱ्यांना त्रास होणार नाही.
२) कामगारांना सुरक्षिततेसाठी मास्क, हँडग्लोज, गमबूट, डेटॉल/सॅनिटायझर बॉटल व गणवेश देणे.
३) कर्मचाऱ्यांना दैनंदिनी भत्ता रु. १५०० ते २००० देण्यात यावा.
४) ज्या कर्मचाऱ्यांना काम करण्याची इच्छा नसेल तर त्यांच्यावर काम करण्याची सक्ती करू नये.
५) काम करण्याच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना दोन वेळचे नाष्टा, पाणी, चहा व जेवण उपलब्ध करून द्यावे. तसेच केंद्रांवर वैद्यकीय सेवा, पोलिस बंदोबस्त ठेवण्यात यावा.
६) कुर्बानी सेंटरवर काम करणाच्या कर्मचाऱ्यांना स्वच्छ भारत अभियानअंतर्गत प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात यावे.
७) मागील वर्षाचा बकरी ईदसाठी केलेल्या विशेष कामाचा थकीत भत्ता कर्मचाऱ्यांना त्वरित देण्यात यावा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.