

वाशी गावातील विकासकामांना मिळणार वेग
आयुक्तांची प्रत्यक्ष पाहणी; पायाभूत सुविधा, वाहतूक व पर्यावरण सुधारण्यावर भर
नवी मुंबई, ता. ८ : नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी वाशी गाव परिसराला भेट देत विविध विकासकामांची पाहणी केली. नगरसेवक निशांत भगत यांनी स्थानिक नागरिकांच्या समस्या व पायाभूत सुविधांबाबत आयुक्तांना सविस्तर माहिती दिली. या वेळी प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
वाशी गावातील जुन्या भुयारी मार्गाची सुधारणा करण्याबरोबरच सायन-पनवेल महामार्गावरील वाढत्या वाहतुकीचा विचार करून अंतर्गत रस्ते सुकर करण्यासाठी ‘सर्व्हिस रोड’ उभारण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. तसेच ग्रामस्थांसाठी सुसज्ज मच्छी व भाजी मार्केट उभारण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली. यामुळे फेरीवाल्यांना आळा बसून महिलांना व व्यापाऱ्यांना सुविधा उपलब्ध होणार आहेत.
पर्यावरणाच्या दृष्टीने सायन-पनवेल महामार्गालगत उद्यान विकसित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. ‘सुगंधी अंगण अभियान’ प्रभावीपणे राबवण्यावरही भर देण्यात आला.
चौकट :
सर्व्हिस रोड उभारणीला प्राधान्य
सायन-पनवेल महामार्गावरील वाढत्या वाहतुकीमुळे वाशी गावात वारंवार कोंडी होत आहे. या पार्श्वभूमीवर अंतर्गत वाहतूक सुरळीत करण्यासाठी सर्व्हिस रोड उभारण्याचा निर्णय महत्त्वाचा ठरत आहे. या मार्गामुळे स्थानिक वाहतूक मुख्य महामार्गापासून वेगळी होऊन अपघातांचे प्रमाण कमी होईल. तसेच नागरिकांना सुरक्षित व जलद प्रवासाची सुविधा मिळेल. या कामाला गती देण्यासाठी संबंधित विभागांना तातडीने कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले आहेत.
कोट
लोकहिताच्या कामांना गती देऊन नवी मुंबईला अधिक सुविधासंपन्न आणि स्वच्छ, सुगंधी बनवण्यासाठी महापालिका प्रशासन कटिबद्ध आहे. नागरिकांच्या सुरक्षेला आणि सोयींना आमचे सर्वोच्च प्राधान्य राहील.
- डॉ. कैलास शिंदे, आयुक्त, नमुंमपा