

कासा-भराड बंदिस्त कालव्याचे काम पूर्ण
शेतकऱ्यांना मिळणार हक्काचे पाणी
कासा, ता. ८ (बातमीदार) : सूर्या प्रकल्पाच्या उजव्या तीरावरील वितरिका क्रमांक एकअंतर्गत राबविण्यात आलेल्या बंदिस्त नलिका वितरण प्रणालीचे काम अखेर पूर्ण झाले आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे कासा ते भराड परिसरातील सुमारे ४५३.६५ हेक्टर क्षेत्राला नियमित आणि नियंत्रित सिंचनाचा लाभ मिळणार आहे. अनेक वर्षांपासून कालव्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचत नसल्याने अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना या प्रकल्पामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
कार्यकारी अभियंता योगेश पाटील आणि पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गुरुवारी (ता. ७) बंदिस्त नलिका वितरण प्रणालीची यशस्वी चाचणी घेतली. त्यानंतर या योजनेद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कासा ते भराडदरम्यान सुमारे सहा किलोमीटर अंतरावर पाइपलाइन टाकण्याचे काम पूर्ण करण्यात आले असून ७ मे रोजी संपूर्ण प्रकल्प पूर्णत्वास गेला.
पूर्वी या भागात मातीचे कालवे असल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत होती. त्यामुळे कालव्याच्या शेवटच्या टोकावरील शेतकऱ्यांना पुरेसे पाणी मिळत नव्हते. याआधी सूर्या प्रकल्पाच्या कालव्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात आल्याने गळती काही प्रमाणात कमी झाली होती; मात्र आता बंदिस्त पाइप प्रणालीमुळे पाण्याचा अधिक कार्यक्षम वापर होणार असून, बाष्पीभवन व गळतीमुळे होणारा अपव्यय पूर्णतः रोखला जाणार आहे.
या योजनेअंतर्गत पूर्वीच्या कालव्यात जेसीबी यंत्राच्या साहाय्याने खोदकाम करून पाइपलाइन टाकण्यात आली असून त्यावर मातीचे आवरण देण्यात आले आहे. नियंत्रित पाणीपुरवठा प्रणालीमुळे शेतकऱ्यांना पिकांच्या गरजेनुसार योग्य दाबाने पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे भाजीपाला, उन्हाळी भात तसेच इतर नगदी पिकांच्या उत्पादनात वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
--------------
नियमित पाणीपुरवठा
तसेच उघड्या कालव्यांमध्ये साचणारे सांडपाणी, अस्वच्छता आणि गाळ साचण्याचा प्रश्नही कायमस्वरूपी निकाली निघणार आहे. बंदिस्त पाइप प्रणालीमुळे शेवटच्या टोकावरील शेतकऱ्यांपर्यंतही पाणी पोहोचणार असल्याने सिंचन व्यवस्थेची विश्वासार्हता वाढणार आहे. या आधुनिक प्रणालीमुळे पाण्याचा अपव्यय टळेल आणि सिंचन व्यवस्थेची कार्यक्षमता वाढेल. शेवटच्या टोकापर्यंतच्या शेतकऱ्यांना आता नियमित पाणीपुरवठा होईल, असे कार्यकारी अभियंता योगेश पाटील यांनी सांगितले.
-------------------
अनेक वर्षांपासून आमच्या शेतात कालव्याचे पाणी पोहोचत नव्हते. त्यामुळे उन्हाळी भातशेती आणि भाजीपाला लागवड करणे शक्य होत नव्हते; मात्र या बंदिस्त प्रणालीमुळे वाया जाणारे पाणी वाचून आता आम्हाला नियमित पाणी मिळणार.
- गंगाराम गुजड, शेतकरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.