स्वच्छ टॉयलेट मोहीम

स्वच्छ टॉयलेट मोहीम
Published on

स्वच्छ टॉयलेट मोहीम
नवी मुंबई महापालिकेतर्फे एकाच दिवशी केले सर्वेक्षण
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ८ : नवी मुंबई महापालिका सध्या शहराचे सार्वजनिक स्वच्छता याबाबत आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी कार्यरत आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत सुरू असलेली स्वच्छता मोहीम, प्रकल्प शहराला जागतिक दर्जाच्या नागरी सुविधांकडे घेऊन जाणारे आहेत. शहरातील स्वच्छता गृह तपासण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. ३८४ अधिकारी व कर्मचाऱ्यांना कामाला लावून महापालिकेने एकाच दिवशी सर्वेक्षण केले आहे.
नवी मुंबई महापालिकेने ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६’ मध्ये आपले अव्वल स्थान टिकवून ठेवण्यासाठी आणि ‘सुपर स्वच्छ लीग’मध्ये मानाचे स्थान मिळवण्यासाठी व्यापक मोहीम हाती घेतली आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून, पालिकेने शहरातील सार्वजनिक आणि सामूहिक स्वच्छतागृहांच्या दर्जाची पडताळणी करण्यासाठी एक विशेष महातपासणी मोहीम राबवली.
७ मे रोजी नवी मुंबई महापालिका प्रशासनाने संपूर्ण शहरात एकाच वेळी स्वच्छतागृहांची तपासणी करण्यासाठी ३८४ विशेष पथके तैनात केली होती. या मोहिमेचे नियोजन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले होते. प्रत्येक पथकात एका स्वच्छता निरीक्षकाची नियुक्ती करण्यात आली होती. यांंच्यावर एका स्वच्छतागृहाच्या सखोल तपासणीची जबाबदारी होती. या पथकांनी दिघा, ऐरोली, महापे, पावणे, एमआयडीसी परिसर, कोपरखैरणे, घणसोली, तुर्भे, वाशी, सानपाडा, जुईनगर, नेरूळ आणि बेलापूर या १३ विभागांमधील गावठाण आणि शहरी भागात प्रत्यक्ष भेटी दिल्या.
३८४ स्वच्छतागृहांच्या तपासणीनंतर सादर करण्यात आलेल्या अहवालात काही ठिकाणी नियमांचे उल्लंघन झाल्याचे दिसून आले आहे. मात्र, महापालिका प्रशासनाने या त्रुटी गंभीर नसून ‘किरकोळ’ स्वरूपाच्या असल्याचे स्पष्ट केले आहे. या त्रुटी तत्काळ दुरुस्ती करून नागरिकांना अधिक प्रभावीपणे दर्जेदार सुविधा देण्याच्या सूचना प्रशासनाने केल्या आहेत.
ही संपूर्ण तपासणी केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियान (नागरी) २.० अंतर्गत निश्चित केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार पार पडली. यामध्ये ३३ प्रकारच्या विविध निकषांचा वापर करण्यात आला होता, ज्याला फेसेस मानके म्हटले जाते.

चौकट
प्रमुख तपासणी निकष :
कार्यात्मकता : वायुविजन, सर्व कक्षांमध्ये पाणीपुरवठा आणि दरवाजांना कड्या असणे.
स्वच्छता : बेसिन, सिंक आणि फरशी कचरामुक्त व डागमुक्त असणे.
सुरक्षा : स्वच्छतागृहाच्या आत आणि परिसरात पुरेशी विद्युत रोषणाई आणि केअरटेकरची उपस्थिती.
पर्यावरणपूरक : सांडपाणी व्यवस्थापन आणि सॅनिटरी नॅपकिन विल्हेवाटीची सोय.
-----------------------------------------------
आढळलेल्या प्रमुख त्रुटी :
अभिप्राय नोंदणीचा अभाव : काही ठिकाणी नागरिकांसाठी आपले मत किंवा तक्रार नोंदवण्यासाठी ‘फीडबॅक रजिस्टर’उपलब्ध नव्हते.
हात धुण्याच्या साधनांची कमतरता : अनेक ठिकाणी महिला व पुरुषांना हात धुण्यासाठी लागणारे साबण, लिक्विड सोप किंवा सॅनिटायझर यांसारख्या साहित्याचा साठा संपलेला आढळला.
ओळख फलकांचा अभाव : काही जुन्या स्वच्छतागृहांवर ‘स्त्री’ आणि ‘पुरुष’ असे स्पष्ट ओळख फलक लावलेले नव्हते किंवा ते अस्पष्ट झाले होते.
----------------------------------------------------
स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ आणि गुणांकन
स्वच्छ भारत अभियानांतर्गत होणाऱ्या या सर्वेक्षणात एकूण १२,५०० गुण आहेत. यामध्ये जमिनीवरील प्रत्यक्ष स्वच्छता आणि नागरी सुविधांच्या देखभालीला १०,५०० गुण असून, त्यापैकी १५०० गुण केवळ प्रत्यक्ष स्थळपाहणीसाठी आहेत. नवी मुंबईने यापूर्वीच ओडीएफ++ मानांकन मिळवले आहे. कोपरखैरणे सेक्टर १४ सारख्या भागात पालिकेने रिसायकल केलेल्या प्लॅस्टिकचा वापर करून अत्याधुनिक स्वच्छतागृहे उभारली आहेत. या ठिकाणी दिवसाला ८,००० ते ९,००० नागरिक वापरतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com