पालिका कर्मचाऱ्यांना ‘एपीएस’चा लाभ

पालिका कर्मचाऱ्यांना ‘एपीएस’चा लाभ
Published on

वाशी, ता. ८ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या शुक्रवारी (ता. ८) झालेल्या बैठकीत नव्याने नियुक्त होणाऱ्या अधिकारी-कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना लागू करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे महापालिका कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. स्थायी समिती सभापती अशोक पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक पार पडली.

१ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी लागू असलेली परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना केंद्र सरकारच्या राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेत वर्ग करण्याचा निर्णय या प्रस्तावाद्वारे घेण्यात आला आहे. सर्वसाधारण सभेच्या २० मार्चच्या ठरावानुसार हा प्रस्ताव स्थायी समितीकडे शिफारस करण्यात आला होता. आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या १२ फेब्रुवारी २०२६ रोजीच्या पत्रानुसार तसेच महाराष्ट्र सरकारच्या नगरविकास विभागाच्या २ फेब्रुवारी २०२२ च्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने ही कार्यवाही प्रस्तावित करण्यात आली होती. या प्रस्तावावर प्रशासन विभागाचे उपआयुक्त किसनराव पांलडे यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, महापालिका कर्मचाऱ्यांचे एनपीएस खाते उघडण्यात येणार असून त्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या वेतनातील १० टक्के रक्कम तसेच पालिकेकडून १४ टक्के हिस्सा जमा केला जाणार आहे. त्यानुसार संबंधित कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर परतावा मिळणार आहे.

पालिका कर्मचारी आणि शिक्षकांच्या भविष्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे. राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेमुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक सुरक्षितता मिळणार असून, त्यांच्या हिताला प्राधान्य देण्याची भूमिका महापालिकेने घेतली आहे.
- अशोक पाटील, सभापती, स्थायी समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com