

ठाणे, ता. ८ (बातमीदार) : अत्यंत प्रतिकूल आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीत शिक्षण घेत ठाण्यातील अनेक ‘एकलव्य’ विद्यार्थ्यांनी यंदाच्या दहावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. घरकाम करणाऱ्या माता, रोजंदारी करणारे पालक, छोट्या चाळीतील राहणीमान आणि शिक्षणासाठी अपुरी साधने अशा परिस्थितीतही या विद्यार्थ्यांनी जिद्दीच्या जोरावर यश मिळवत समाजासमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.
समता विचार प्रसारक संस्थेतर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘एकलव्य गौरव पुरस्कार’ उपक्रमाच्या ३४व्या वर्षात यंदाही प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्षा हर्षलता कदम यांनी दिली. राबोडी येथील झोया अरफुद्दीन शेख हिने ८६ टक्के गुण मिळवत दहावी उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला. वडिलांचा आधार नसताना तिची आई घरकाम करून संसाराचा गाडा चालवत आहे. तसेच राबोडीतीलच इशरत शेख हिने ९२ टक्के गुण मिळवत शाळेत प्रथम क्रमांक पटकावला. तिचे वडील शिवणकाम करतात, तर आई घरकाम करते. कळवा पाइपलाइन परिसरातील आयुष मौर्य, कांचन हरिजन, आंचल बेचन सिंग आणि हिमांशु गौतम यांनीही अत्यंत कठीण परिस्थितीत दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली. दिवा येथील ग्रीष्मा पाटील, सोनल जेट्टी, रमाबाई आंबेडकर नगरातील अदिती गरड, यश घोंगडे, परिणीता उबाळे यांच्यासह ठाणे महापालिका शाळांतील अनेक विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. मानपाडा, किसन नगर आणि इतर भागांतील विद्यार्थ्यांनीही आर्थिक अडचणींवर मात करत चांगले गुण मिळवले आहेत. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा पुढील महिन्यात भव्य कार्यक्रमात सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेच्या सचिव लतिका सु. मो. यांनी दिली.
ठाणे : ठाण्यातील ‘एकलव्य’ विद्यार्थ्यांनी दहावी परीक्षेत यश संपादन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.