

मोरबे धरणात ८५ दिवसांचा पाणीसाठा
नवी मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचे आयुक्तांचे आवाहन
वाशी ता. ९ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेच्या मालकीच्या मोरबे धरण प्रकल्प क्षेत्राची पाहणी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी शनिवारी केली. या वेळी धरणातील जलसाठ्याची स्थिती, परिसरातील जमीन, सीमांकन तसेच सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना विविध सूचना देण्यात आल्या.
हवामान खात्याने यंदा ‘एल निनो’च्या प्रभावामुळे देशातील पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी राहण्याचा आणि पावसास उशीर होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी मोरबे धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याची माहिती घेतली. सध्या धरणात सुमारे ८५ दिवस पुरेल एवढा पाणीसाठा उपलब्ध असल्याचे या वेळी स्पष्ट करण्यात आले. संभाव्य कमी पर्जन्यमान लक्षात घेता नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन आयुक्तांनी केले. तसेच आगामी परिस्थितीनुसार लोकप्रतिनिधींसोबत चर्चा करून पाणीपुरवठ्याबाबत नियोजनात्मक निर्णय घेण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.
या पाहणी दौऱ्यात आयुक्तांनी धरण परिसराच्या दोन्ही बाजूंनी प्रत्यक्ष क्षेत्रपाहणी केली. एका बाजूने आंबेवाडीपर्यंत सुमारे ७.५ किलोमीटर, तर दुसऱ्या बाजूने पिरकटवाडी आणि उंबरणेवाडीपर्यंत सुमारे ११ किलोमीटर अंतराची पाहणी करण्यात आली. या वेळी काही ठिकाणी धरण क्षेत्रालगत खासगी बांधकामे आढळून आल्याने संबंधित जागांची हद्द तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. रायगड जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तातडीने मोजणी व सीमांकन करून आवश्यक त्या ठिकाणी कुंपण उभारण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले.
===
धरण परिसरात वृक्षांची लागवड करा
धरण परिसरात पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने देशी वृक्षांची लागवड करावी, तसेच परिसरात स्वच्छता मोहीम राबवावी, अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. धरणाच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या पिरकटवाडी व अन्य वाड्यांमधील पुनर्वसनास नकार दिलेल्या कुटुंबांच्या सुविधांबाबत तपासणी करून पुनर्वसनाच्या दृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देशही या वेळी देण्यात आले. या पाहणीवेळी अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे, मालमत्ता विभागाचे उपआयुक्त भागवत डोईफोडे, अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त संजय शिंदे, उद्यान विभागाच्या उपआयुक्त स्मिता काळे, कार्यकारी अभियंता संतोष उनवणे यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.