पाणथळ जागा वाचवण्यासाठी पर्यावरणप्रेमींची एकजूट!

पाणथळ जागा वाचवण्यासाठी पर्यावरणप्रेमींची एकजूट!
Published on

पाणथळ जागा वाचवण्यासाठी पर्यावरणप्रेमींची एकजूट!

बेलापूर, ता. ९ (बातमीदार) : नवी मुंबईतील खारफुटी आणि पाणथळ जागांचे संरक्षण करण्यासाठी पर्यावरणप्रेमी, पक्षीप्रेमी आणि नागरिकांनी पुन्हा एकदा एकजूट दाखवत सिडको प्रशासनाविरोधात आवाज उठवला आहे. जागतिक पक्षी स्थलांतरित दिनानिमित्त शनिवारी (ता. ९) आयोजित आंदोलनात शेकडो नागरिकांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहभाग घेत ‘पाणथळ जागा वाचल्या पाहिजेत’ अशी जोरदार मागणी केली.

नवी मुंबईतील खाडी परिसरात मोठ्या प्रमाणात पाणथळ जागा असून, या भागात विविध पक्ष्यांसह फ्लेमिंगोंचा अधिवास आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पर्यावरणप्रेमी संस्था या जागांच्या संरक्षणासाठी प्रयत्न करीत आहेत. यापूर्वी सिडको आणि नवी मुंबई महापालिकेकडून काही पाणथळ जागांवर निवासी आणि व्यावसायिक प्रकल्प उभारण्याचे प्रयत्न करण्यात आले होते; मात्र पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांच्या विरोधानंतर तसेच न्यायालयीन लढाईमुळे हे प्रस्ताव मागे घ्यावे लागले होते. तरीही सिडको प्रशासन पाणथळ जागांवर विविध प्रकल्पांच्या नावाखाली बांधकाम करत असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला आहे. ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पाणथळ सनियंत्रण समितीच्या बैठकीनंतर काही जागा पाणथळ नसल्याचा अहवाल सादर झाल्याने पर्यावरणप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.
---
फ्लेमिंगोंच्या अधिवासाला सिडकोचा अडथळा
नेरूळ, सीवूड्स परिसरातील टी. एस. चाणक्य, डीपीएस लेक या परिसरात मोठ्या प्रमाणात फ्लेमिंगोंचा अधिवास असतो; मात्र या जागांवर पाणथळ जागा बुजवून त्या ठिकाणी इमारतींचे बांधकाम उभारण्याचा सिडकोचा डाव असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींकडून करण्यात येत असून, फ्लेमिंगोच्या अधिवासाला सिडकोचा अडथळा असल्याचा आरोपदेखील नागरिकांनी केला आहे.
------
फ्लेमिंगो आरक्षित जागा न्यायालयाकडून घोषित असतानाही या जागा हडपण्याचा सिडकोचा डाव आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. आज गेली १२ वर्षे आम्ही यासाठी लढा देत असून, पुढे पण आमचा लढा सुरू राहील. फ्लेमिंगोंचे संरक्षण करणे, त्यांच्या अधिवासाचे रक्षण करणे वन विभागाची जबाबदारी असून, तसे प्रत्यक्ष होत नसल्याने आम्हाला रस्त्यावर उतरावे लागत आहे.
- सुनील अग्रवाल, संचालक, सेव्ह नवी मुंबई इन्व्हायर्नमेंट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com