

अमराठी विद्यार्थिनीचा डंका
दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी
भाईंदर, ता. १० (बातमीदार) : दहावीच्या परीक्षेच्या निकालांत मिरा-भाईंदर पालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे, मराठी माध्यमात शिकणाऱ्या अमराठी विद्यार्थिनीने ९० टक्के गुण मिळवून पालिका शाळांमध्ये प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.
पालिका शाळा क्रमांक ४ मधील सपनाकुमारी साहने ९० टक्के गुण प्राप्त करून महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये प्रथम येण्याची कामगिरी केली आहे. त्यामुळे तिचे विशेष कौतुक केले जात आहे. याच शाळेतील वैष्णवी घुलेने ८६.६० टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला असून, शाळा क्रमांक १४ मधील यश सिंहने ८३.४० टक्के गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक मिळविला आहे. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या उल्लेखनीय यशाबद्दल महापौर डिंपल मेहता, आयुक्त राधाबिनोद शर्मा, उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे.
-------------------------------
शिक्षण सुविधांवर भर
- महापालिका शाळांचा एकूण निकाल ९४.५४ टक्के लागला आहे. गेल्या वर्षी पालिका शाळांचा निकाल ९०.४५ टक्के इतका होता. यंदा परीक्षेसाठी २३८ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी २२५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
- महापालिका शाळांमध्ये स्पर्धात्मक परीक्षांसाठी विशेष प्रशिक्षण सत्रे, वैयक्तिक मार्गदर्शन, पूरक अध्यापन व तंत्रज्ञानाधारित शिक्षण सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.