घोडबंदर-गायमुख रस्ता पालिकेकडेच

घोडबंदर-गायमुख रस्ता पालिकेकडेच
Published on

भाईंदर, ता. १० (बातमीदार) : घोडबंदर ते गायमुख रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीचा खर्च पेलवत नसल्याने हा रस्ता राज्य सरकारकडे हस्तांतर करण्याचा निर्णय मिरा-भाईंदर महापालिकेने काही महिन्यांपूर्वी घेतला होता; मात्र या निर्णयात बदल करत हा रस्ता महापालिकेकडेच ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून, देखभाल दुरुस्तीचा खर्च मात्र राज्य सरकारच्या खांद्यावर देण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

मिरा-भाईंदरच्या हद्दीतील घोडबंदर येथील फाऊंटन हॉटेल ते गायमुख या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने हा रस्ता ६० मीटर रुंद करायचा आहे. त्यासाठी आवश्यक असलेली भूसंपादनाची जबाबदारी मिरा-भाईंदर महापालिकेवर देण्यात आली असून, हा रस्ता राज्य सरकारकडून महापालिकेकडे दोन वर्षांपूर्वी हस्तांतर करण्यात आला; मात्र त्यासोबतच रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारीही महापालिकेवरच येऊन पडली आहे. गेल्यावर्षी पावसाळ्यात रस्ता दुरुस्त करण्यासाठी महापालिकेला तब्बल आठ कोटी रुपये खर्च करावे लागले. हा खर्च पेलवत नसल्याने फेब्रुवारी महिन्यात झालेल्या महासभेत हा रस्ता पुन्हा राज्य सरकारकडे हस्तांतर करण्याचा निर्णय सत्ताधारी भाजपने घेतला होता; मात्र हा निर्णय मागे घेत रस्ता महापालिकेकडेच ठेवण्यात यावा; मात्र देखभाल दुरुस्तीचा खर्च राज्य सरकारने करावा, असा निर्णय नुकत्याच पार पडलेल्या महासभेत घेण्यात आला आहे.

भूसंपादनाचा खर्च राज्य सरकार-एमएमआरडीए देणार

गेल्या महिन्यात दहिसर ते काशीगाव या मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण झाले. त्या वेळी मुख्यमंत्र्यांनी हा रस्ता महापालिकेकडेच ठेवण्याबाबत सूचना दिल्या. रस्त्याचे लवकरात लवकर रुंदीकरण करून त्यावर मेट्रोचे काम सुरू करायचे आहे. रस्ता रुंदीकरणांसाठी भूसंपादन करणे आवश्यक असून, ते गतीने व्हावे, यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया महापालिकेनेच करावी, भूसंपादनासाठी लागणारा खर्च राज्य सरकार किंवा एमएमआरडीए देईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. त्यानुसार हा रस्ता महापालिकेच्या ताब्यातच ठेवण्याचा निर्णय महासभेने घेतला आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com