ठाण्यात नालेसफाई मजुर उघड्यावर

ठाण्यात नालेसफाई मजुर उघड्यावर
Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ११ : पावसाळ्यापूर्वी ठाणे महानगरपालिकेकडून सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांदरम्यान स्थलांतरित मजुरांच्या अमानुष वास्तवाचा गंभीर मुद्दा समोर आला आहे. जळगाव आणि मालेगाव येथून आणलेल्या सुमारे ३० मजुरांना निवारा, स्वच्छ पाणी, शौचालय आणि सुरक्षेच्या मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवण्यात आल्याचा आरोप श्रमिक जनता संघाने केला आहे. या पार्श्वभूमीवर संघटनेचे महासचिव जगदीश खैरालिया यांनी महापौर आणि आयुक्तांना तातडीचे पत्र देत प्रशासनाने त्वरित हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.

नौपाडा प्रभाग समितीअंतर्गत सुरू असलेल्या नालेसफाईसाठी संबंधित ठेकेदाराने ग्रामीण भागातील मजूर ठाण्यात आणल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. या मजुरांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. काही दिवस ते दादोजी कोंडदेव स्टेडियम परिसरात उघड्यावर राहत असल्याचे निदर्शनास आले. स्टेडियममध्ये कार्यक्रम असल्याने त्यांना तेथूनही हटविण्यात आल्याने आता त्यांच्या डोक्यावर छतच उरले नसल्याचा दावा करण्यात आला आहे. खैरालिया यांनी ८ आणि ९ मे रोजी प्रत्यक्ष पाहणीदरम्यान हे कामगार उघड्यावर जेवण करत असल्याचे पाहिल्याचे पत्रात नमूद केले आहे. महिलांच्या सुरक्षेपासून लहान मुलांच्या आरोग्यापर्यंत अनेक प्रश्न निर्माण झाले असून, प्रशासनाने तातडीने सुरक्षित निवार्‍याची व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

६०० रुपयांत नालेसफाई
 मजुरांना दररोज केवळ ६०० रुपये दिले जात असल्याची माहिती मुकादमाने दिल्याचा उल्लेख पत्रात आहे. हे मानधन किमान वेतन कायद्याच्या निकषांपेक्षा कमी असल्याचा दावा संघटनेने केला आहे. धोकादायक स्वरूपाच्या नालेसफाईच्या कामासाठी मजुरांना केवळ जाकीट देण्यात आले आहे. इतर कोणतीही सुरक्षा साधने उपलब्ध नाही. कामगारांच्या वेतनवाटपावर महापालिकेच्या अधिकार्‍यांची देखरेख असावी, तसेच कामादरम्यान दुखापत झाल्यास उपचाराची संपूर्ण जबाबदारी ठेकेदारावर निश्चित करावी. याशिवाय ठेकेदारांची बिले मंजूर करण्यापूर्वी ‘कामगार तपासणी’ बंधनकारक करण्याची मागणीही संघटनेने प्रशासनाकडे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com